बुलढाणा : मृत वडील व भावाच्या आत्मशांतीसाठी एकाने चक्क स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात तीन मांत्रिकाच्या उपस्थितीत दिव्यांची आरास मांडल्याने शहरातील मातामहाकाली परिसर अक्षरशः हादरला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.


यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की ,शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे व भावाचे निधन काही महिन्यापूर्वी झाले आहे. त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली आहे असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्यावर उपाययोजना म्हणून आशीष गोठी याने शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन मांत्रिकांना कै. लक्ष्मण हिरु चव्हाण स्मशानभूमीत पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात चक्क दिव्यांची आरास मांडली व मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला.


या घटनेची माहिती वाऱ्यासारखी मातामहाकाली परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली. या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला. तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांचे संभाषण सुरु होते. असंख्य नागरिकांनी हा प्रकार बघितला मात्र भीतीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही. दरम्यान या घटनेची माहिती नागरिकांनी कळवताच पोलीस उपनिरीक्षक एस.जी.ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आशिष गोठी व त्या तीन मांत्रिकांना ताब्यात घेतल्यानंतर हादरलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. 


दरम्यान सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहर पोलिसांनी आशिष गोठी याच्याविरुद्ध कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर त्या तीन मांत्रिकांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याविषयी मलकापूर शहर  पोलीस निरीक्षक काटकर यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणात काहीही तथ्य नसून आम्ही संचारबंदीच्या उल्लंघन प्रकरणी संबंधितांवर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.


महत्वाच्या बातम्या :