कंदहार : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघारी घ्यायला सुरुवात केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगाला वाटत असलेली चिंता आता खरी होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून त्यांनी मोठ्या भूभागावर वर्चस्व मिळवल्याचं स्पष्ट झालंय. अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडली असताना भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणलं आहे.
कंदहारमधील भारतीय दूतावासातील भारतीय कर्मचाऱ्यांना देशात विशेष विमानाच्या माध्यमातून परत आणण्यात आलं आहे. कंदहार दूतावास तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने अद्याप सुरु असल्याचं परराष्ट्र खात्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
भारताने आपले कंदहारमधील दूतावास बंद केल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध होत होत्या. त्यावर आता परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते असलेल्या अरिंदम बागची यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "भारत अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे. कंदहार दूतावासात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. कंदाहारमधील भारतीय दूतावास अद्याप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेता भारतीय कर्मचाऱ्यांना देशात परत आणलं आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तात्पुरती ही उपाययोजना करण्यात आली आहे. कंदहार मधील दूतावास तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरुच राहणार आहे."
अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि भारतात सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटना या कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करु शकतात अशी शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने देशात आणण्यत आलं आहे.
अफगाणिस्तानात तालिबान्यांनी आता उच्छाद मांडायला सुरुवात केली असून ते कंदहार शहराच्या जवळपर्यंत पोहोचले आहेत. अमेरिकेच्या सैन्य माघारीच्या पार्श्वभूमीवर तालिबानने अफगाणिस्तानच्या 85 टक्के भूभागावर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jammu Kashmir : दहशतवाद्यांशी संबध असणाऱ्या 11 सरकारी कर्मचाऱ्यांची गच्छंती; हिजबूल मुजाहिद्दीन प्रमुखाच्या दोन मुलांचा समावेश
- Sharad Pawar : केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही : शरद पवार
- LNG मुळे क्रुड आईल आयात खर्चात कपात, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार: नितीन गडकरी