Copa America 2021 : लिओनेल मेस्सी (Lionel messi) च्या नेतृत्त्वात अर्जेंटीनाच्या संघानं ब्राझीलला 1-0नं हरवत कोपा अमेरिका 2021 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेचं जेतेपदं पटकावलं आहे. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. अर्जेंटीना विरुद्ध ब्राझीलमध्ये रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात अर्जेंटीनाचा विजय झाला अन् मेस्सीचं स्वप्न साकार झालं. अशातच या सामन्यानंतर घडलेल्या आणखी एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एवढंच नाहीतर हा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणीही आलं. 


सामना जिंकल्याचं जाहीर होताच मेस्सीच्या डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. लिओनेल मेस्सी गुडघ्यांवर बसला आणि आपल्या हातांनी त्यानं आपला चेहरा झाकून घेतला. त्यानंतर अर्जेंटीनाच्या सर्वच खेळाडूंनी मेस्सीकडे धाव घेतली आणि मेस्सीला उचलून घेत विजय साजरा केला. पुरस्कार वितरण सोहळ्यात मेस्सीनं ट्रॉफी हातात घेतली आणि वर उंचावली. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या ब्राझील संघाचा स्टार खेळाडू नेमारच्या डोळ्यात मात्र पराभवामुळे अश्रू तराळले होते. 



जगभरातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूंमध्ये समावेश होणारे हे दोन दिग्गज खेळाडू, मेस्सी अन् नेमार. मात्र समान्यानंतर एकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तर सामन्यातील पराभवामूळ दुसरा भावूक. अशा परिस्थितीत फुटबॉल प्रेमींना मात्र वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. सामना हरल्यानंतर त्याचं दुःख नेमारच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. नेमारच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. अशावेळी लिओनेल मेस्सीनं नेमारला कडकडून मिठी मारली. मेस्सीनं मिठी मारल्यानंतर नेमारला रडू आवरलं नाही आणि तो अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून मेस्सीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 



दरम्यान, ब्राझीलनं 2019 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. परंतु, दुखापतीमुळं नेमार या स्पर्धेत खेळू शकला नव्हता. अशातच या स्पर्धेत नेमार संघाला विजय मिळवून देण्यासाठी आणि विजयाचा भागीदार होण्यासाठी सतत प्रयत्नशील दिसून आला. अशातच यंदा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना काहीसा खास ठरला. या अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकाच मैदानात एकमेकांविरोधात खेळताना पाहण्याचं भाग्य या सामन्यात फुटबॉल प्रेमींना मिळालं. या सामन्यात मेस्सी आणि नेमार हे 2 फॉरवर्ड एकमेकांविरोधात मैदानावर उतरले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :