पुणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या कार्यालयातून निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झालीय का? तर हो झालीय. आगामी निवडणुकांमध्ये  मनसेचे वातावरण चांगलंच असेल. सध्या माझं इंजिन मीच चालवतोय. निवडणुकांमध्ये परिस्थितीनुसार एकला चलो रे अशी भूमिका राहील, असं राज ठाकरे म्हणाले. 


सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा
आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले की,  मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता. त्यावेळी सगळेच नेते गेले होते. त्यावेळी सगळ्यांना मान्य होतं तर मग अडलंय कुठे. केंद्राच्या सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे. मग अडवलय कुणी? कोर्टात व्यवस्थित मांडल जात नाही का?  फक्त माथी भडकवायची आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा. कोण कुणाचा शत्रू आहे हेच कळत नाही. समाजाचे प्रश्न आले की तोंड फिरवायचे. आता समाजाने विचारलं पाहिजे. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का काय आहे हे समाजाने बघितलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. 



विमानतळाच्या नामकरण प्रकरणी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज ठाकरे म्हणाले की,  विमानतळ नाव प्रकरणी मी सर्व बोललो आहे.  मी पुण्यात स्थायिक झालो तर मी राज मोरे नाही होणार, राज ठाकरेच राहणार आहे. विमानतळ फक्त शिफ्ट होत आहे, तर नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले. 


Navi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव देण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला कृती समितीचा विरोध


ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  काँग्रेस असतांना ही असाच गैरवापर झाला. भाजप असतानाही तोच वापर होतोय. ईडीचा बाहुली म्हणून वापर करू नये. ज्यांनी खरे गुन्हे केले ते गुन्हेगार मोकाट फिरत आहेत.  मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असंही राज ठाकरे म्हणाले. 


राज ठाकरे म्हणाले की, नारायण राणे मंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केले होते पण त्यांचे फोन बंद होते. त्यांच्या मुलाला पण फोन केला होता, असं ते म्हणाले.