बुलढाणा : बुलढाणा (Buldhana Crime News) जिल्ह्यातील संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन (ATM) चोरी प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांच्या सुसज्ज टोळीने चक्क एटीएम मशीनच उचलून नेल्याची घटना संग्रामपूर येथे घडली. या खळबळजनक घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. त्यानंतर लगेच पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या आरोपींचा शोध सुरू केला असता, जालना जिल्ह्याच्या हद्दीत चोरटे आढळून आले. पकडलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दरोडा टाकण्याचे साधन साहित्य आढळून आले. या सोबतच त्याच्या ताब्यातील अशोक ली लॅण्ड पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशिन,  इतर साधन साहित्य असा एकूण साडेपाच लाखांच्या किंमतीचा मुद्येमाल आढळून आला. 


अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद 


केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव हे संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्प यात्रेवर आहेत. दरम्यान सर्व पोलीस यंत्रणा या यात्रेत व्यस्त असतील, असा विचार या टोळीचा होता. या संधीचा फायदा घेत या चोरट्यांच्या टोळीने हे कृत्य केले. आज पाहाटे संग्रामपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे चक्क एटीएम मशीनच पळवण्याचे धाडस या टोळीने केले. मात्र आवघ्या काही तासांत पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.  


दोघे आरोपी ताब्यात, तिघांचा शोध सुरू 


पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आज रविवार, 7 जानेवारीच्या सकाळी मौजपुरी हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एका गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. ज्यामध्ये काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत रामनगर कारखाना परीसरातील हॉटेल लंकाच्या पाठीमागे दबा धरुन बसले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत धाड टाकली, त्यावेळी तेथे पाच इसम अशोक ली लॅण्ड वाहनाच्या मागे दबा धरुन बसल्याचं आढळून आलं, त्यानंतर पोलिसांना बघताच त्यांनी पळ काढायला सुरुवात केली. परंतु त्यातील तीन आरोपींना पळून जाण्यात यश आलं, तर दोन आरोपींना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. दयालसिंग गुलजारसिंग टाक (रा. म्हाडा कॉलनी, टि.व्ही. सेंटर, जालना) आणि नरसिंग अथरसिंग वावरी (रा. शिक्कलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, जालना) अशी पकडलेल्या आरोपींची नावं आहेत. तर पळुन गेलेल्या तीन आरोपींपैकी एका आरोपीचे नाव आकाशसिंग नरसिंग बावरी (रा. शिक्कलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, जालना) असे आहे. 


आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीतील


पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीतील असून या दोघांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आरोपींवर जालना येथे गुन्हा रजि.नं.-06/2024 कलम 399,402 भादंवि सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून उर्वरित फरार आरोपींचा देखील लवकरच शोध घेतला जाईल, अशी माहिती जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या: