पुणे: जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे, सर्व वाद हे जमिनीसाठी होतात, महाराष्ट्राचा भूगोल हा धोक्यात आहे, इथल्या जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. याची सुरूवात रायगडपासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सीलिंकमुळे (Nhava Sheva Atal Setu) रायगडचं वाटोळं होणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते मराठी नाट्य संमेलनामध्ये बोलत होते. 


राज ठाकरे म्हणाले की, जगाचा इतिहास हा भूगोलावर म्हणजे जमिनीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सर्व आक्रमकांनी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भूगोल काबिज करण्यासाठी जो संघर्ष आहे त्याला इतिहास म्हटलं जातंय. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. तो अतिशय हुशारीने विकत घेतला जात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं अस्तित्व संपवलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.


पहिला रायगड जिल्हा बरबाद होणार


राज ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्हा पहिला बरबाद होणार. बाहेरचे लोक येतात, जमिनी घेतातयत आणि मालक होणार. त्यामुळे रायगडचे लोक इथे नोकर होणार. न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचं वाटोळं होणार. या आधी मी पुण्याबद्दल तसं सांगितलं होतं, आता तेच होतंय. 


बुलेट ट्रेनची गरज काय हे मला अजूनही कळालं नाही. दोन तासामध्ये मुंबईमधून अहमदाबादला जाण्याने कुणाचा फायदा होणार आहे? त्यासाठी एक लाख कोटी रपये कशाला खर्च करायला पाहिजे? असा प्रश्नही त्यांनी विचारला. 


महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाने राजकारणात यावं


महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय समाजाने सर्व ठिकाणी पुढे आले पाहिजे, राजकारण असो वा समाजकारण असो त्यामध्ये मध्यमवर्गाने भाग घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. देशातल्या सर्व विचारांना महाराष्ट्राने जन्म दिला. जातीपाती आणि इतर गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा आपण सुज्ञ झाले पाहीजे असं राज ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत, आज जे काही जातीपातीच्या नावावर सुरू आहे त्यामागे कुणीतरी वेगळेच आहेत असं राज ठाकरे म्हणाले. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. 


नाटकात आणि शाळेतही जातीपातीचं राजकारण


आपला मराठी माणूस हा महाराष्ट्राचा इतिहास विसरला आहे. खरं तर आपण राज्यकर्ते होतो आपण, देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. आता आपण सगळे जातीपातीत भांडत बसलोय. आता ही जातपात फक्त राजकारणात नाही तर नाटकात, शाळेत ठिकठिकाणी आलेली आहे हे दुर्दैव आहे.


दादा, मामा ही नाती घरीच ठेवा, एकमेकांना मान द्या


पहिली आणि शेवटची गोष्ट तुम्ही कलाकारांनी एकमेकांना मान दिला नाही अन् नको त्या नावाने एकमेकांना हाका देत बसलात तर मराठी चित्रपटसृष्टीतून एकही स्टार निर्माण होणार नाही. इतर राज्यातील कलाकारांकडे बघा. रजनीकांत आणि इलाहीराजा रात्री एकत्र बसून दारू बसत असतील, मात्र मंचावर आले की ते एकमेकांना सर म्हणून आदर देतात. 


मराठी कलावंतांनी याचं अनुकरण करायला हवं, मानसन्मान द्या. तुम्ही जर नाक्यावर उभं राहिला तर तुम्हाला कोणी पैसे देऊन पाहायला येणार नाही. आज अशोक सराफ हे चौकात उभे राहिल्याचे दिसले नाहीत, म्हणून मी पैसे मोजूनचं त्यांना पाहायला जाईन. आता इथं प्रशांत दामले अध्यक्ष आहेत. आता मी चार भिंतीत त्यांना काहीही म्हणेन, मात्र इथं मी त्यांना सर म्हणेन. आता अशोक सराफांना हे काय म्हणतात मामा, अरे तुझा काय सख्खा मामा आहे का? अरे सर म्हणा ना? आता शरद पवार इथं आले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन, कारण तो बुजुर्ग नेता आहे. माझ्या भाषणात मी त्यांच्यावर बोलेन मात्र समोर आल्यावर त्यांचा त्यांना मानसन्मान देईनच. त्यामुळं मराठा कलावंतांनी ही गोष्ट पाळायला हवी.


कलाकार, साहित्यिक नसते तर अराजकता माजली असती


मला निवडणूक लढायला लाज वाटते. कारण गेली 70 वर्षे काय तर माझे आजोबा, काका जे बोलले आज मी ही तेच बोलतोय. अरे तेच ते विषय, मग आपण पुढं कधी जाणार? नाटक, कलाकार, साहित्यिक हे नसते तर कधीच अराजकता आली असती. कारण लोक तुमच्यात गुंतून पडतात, त्यामुळं दुसरीकडे दुर्लक्ष झालं. तुम्ही जर रात्रीच्या मालिका बंद केल्या तर सासू-सुनांमध्ये खरी भांडणं होतील, म्हणून तुमचे आभार.


माझ्याकडे जो येतो त्याच्या नजरेतून समस्येकडे पाहतो


भाषण करताना आणि भाषण करण्यापूर्वी मी विचार करतो. माझ्याकडे जो येतो, त्याच्या चप्पलेमध्ये मी पाय घालून पाहतो. माझी काय परिस्थिती होईल, याचा विचार केला, तुमच्या जाणिवा जाग्या असल्या की सर्व प्रश्न मिटतात. मुळात सरकार कोणाचं ही असो ते जनतेच्या करातून चालतं. मग त्यांचे प्रश्न मिटवले तर तुमचं काय जातंय? कामं करायला हवीतच.


ते जमत गेलं, जुळत गेलं. मी जेव्हापासून त्यांना भेटलो तेव्हापासून त्यांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम करतात. लताताईंनी माझ्याशी संवाद साधताना ते प्रेम दिलं. पहिला फोन आला तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही का फोन केला, मग मीच जाऊन भेटलो. त्यांचे आणि माझे संबंध खूप घनिष्ठ होते. सध्या मी त्यांच्यावरील पुस्तकाचं काम करतोय. मी पुस्तक आणतोय, त्याचं प्रिंटिंग ही झालंय. लतादिदींना मी त्या पुस्तकाचे कव्हर ही दाखवलं, तेंव्हा त्यांनी अरे वाह असं म्हणत, हे फक्त तूच करू शकतोस अशी प्रतिक्रिया दिली.


ही बातमी वाचा :