बुलढाणा : कमी खर्च आणि महाराष्ट्राच्या वातावरणाला अनुकूल असं पीक म्हणून सोयाबीनच्या (soybean) पिकाकडे महाराष्ट्रातील शेतकरी बघत असतात. मात्र सध्या राज्यातील सोयाबीनला (Soybean Crop) योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच बुलढाणा(Buldhana News) येथील एका संतप्त शेतकाऱ्याने हातात कोयता आणि पिस्तूल घेत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने केली. यावेळी या परिसरात काहीसा गोंधळ बघायला मिळाला. सोयाबीनला प्रती क्विंटल 6 हजार रुपये दर मिळावे, अशी या शेतकऱ्याची मागणी होती. मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या रागातून त्याने रस्त्यावर सोयाबीन फेकून देत निदर्शने केली.
सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नसल्याचा राग अनावर
यावर्षी महाराष्ट्रात 50 लाख 85 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदा सुरुवातीलाच पाऊस एक महिना उशिराने आला. दरम्यान, पावसाचा लहरीपणा पाहायला मिळाला. त्यामुळे, याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या वाढीवर झाला. अनेक ठिकाणचे सोयाबीनचे झाड वाढलीच नव्हती. त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. अनेकांनी आपल्याकडे असलेल्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा विशेष परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला नाही. यात कमी म्हणून की काय त्यानंतर येलो मोझॅक नावाचा बुरशीजन्य रोग सोयाबीनवर पडला. त्यामुळे सुद्धा सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन निम्म्याने घटल्याचं शेतकरी सांगत आहेत. हात तोंडाशी आलेले पीक हिरावून गेला असतांना आता उर्वरित शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या अशाच एका शेतकाऱ्याने आज सोयाबीनला भाव मिळत नसल्याच्या रागातून हातात कोयता आणि देशी कट्टा घेत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शनं करत आपला राग व्यक्त केला आहे.
शेतकऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
रवी महानकार अस या शेतकऱ्यांचं नाव असून हा शेतकरी अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा या गावचा रहिवासी आहे. या शेतकऱ्याने आतापर्यंत 100 क्विंटल सोयाबीन विकल्याच म्हटल आहे. मात्र मिळालेला मोबदला हा अतिशय कमी असून आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल 6 हजार रुपये दर मिळावा. अशी या शेतकऱ्याची मागणी आहे. आज शेतकऱ्यांवर अन्याय होत असून मी माझ्या सोबत आणलेली सोयाबीन रस्त्यावर फेकून या सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यासाठी मी आज हातात शस्त्र उचलले असल्याचा सोयाबीन उत्पादक शेतकरी रवी महानकर म्हणाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सध्या रवी महानकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: