BRS Party Withdraw In Lok Sabha Election : आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) जाहीर केल्या जाणार असून, राज्यात आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री करून राजकीय वातावरण तापवणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाने मात्र महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतून (Maharashtra Lok Sabha Election) माघार घेतली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण याबाबत पक्षाकडून कोणतेही भूमिका स्पष्ट करण्यात आली नसून, राज्यातील बीआरएस पक्षाचे काम थांबले असल्याची प्रतिक्रिया बीआरएस पक्षाचे विदर्भ संघटक चरण वाघमारे यांनी दिली आहे. 


तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षानं महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी दमदार एन्ट्री केली होती. मात्र, तेलंगणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाचा पराभव झाल्यानंतर, महाराष्ट्रतील बीआरएस पक्षाची सुरू असलेली घोडदौड संथ झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे बीआरएस पक्षाचे राज्यातील एकमेव नागपूर येथील कार्यालय देखील बंद पडले आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने इतर पक्षांची साथ सोडून बीआरएसमध्ये जाणाऱ्या नेत्यांची कोंडी झाली आहे. 


महाराष्ट्रातील पक्ष चालवायचा की नाही?


दरम्यान याबाबत बोलतांना बीआरएस पक्षाचे विदर्भ संघटक चरण वाघमारे म्हणाले की, “महाराष्ट्रातील बीआरएसचं काम थांबलं, बंद झालेलं आहे. तेलंगणातील सरकार गेल्यानंतरही महाराष्ट्रातील पक्षाचं काम थांबणार नाही, ही अपेक्षा होती. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रातील पक्ष चालवायचा की नाही, याबाबत आम्हाला त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. महाराष्ट्रातील पहिले कार्यालय असलेले नागपूर कार्यालयाच्या चाव्या जमा करायला सांगितल्यात. महाराष्ट्रातील बीआरएसचं काम थांबलेलं आहे, बंद झालेलं आहे, असे वाघमारे म्हणाले.  


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला 


बीआरएसचं काम थांबल्याने आता आम्ही पुढची रणनीती करायला मोकळे आहोत. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. माझ्याबद्दल कोणीही नाराजगी व्यक्त करायला तयार नसेल, तर मी महाविकास आघाडीची उमेदवारी घ्यायला तयार आहे.  लोकसभा निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होईल.परिणय फुके यांनी किती निवडणुका लढवायच्या याबाबत आत्मपरीक्षण करावं. परिणय फुके यांचं आव्हान मोठं राहणार नाही. जनता त्यांना धडा शिकवेल असेही वाघमारे म्हणाले.  


लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाकडून अजून कोणतेही आदेश आले नाही : शंकर अण्णा धोंडगे 


दरम्यान बीआरएसचे मराठवाड्यातील महत्वाचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्याशी संपर्क साधला असता, “लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाकडून अजून कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि केसीआर यांचा झालेला अपघातानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. राजकारणात चढ-उतार सुरु असतात. मात्र, अजून तरी लोकसभाबाबत पक्षाकडून कोणतेही सूचना आलेली नाही असे धोंडगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


South Mumbai Loksabha : दक्षिण मुंबईत भाजपने राहुल नार्वेकरांसाठी जोर लावला, पण शिवसैनिकांनी घेतलेल्या भूमिकेनं खळबळ!