Breaking News LIVE : औरंगाबाद वाळूज भागात कंपनीमध्ये तोडफोड, गुन्हा दाखल

Breaking News LIVE Updates, 7 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Sep 2021 07:47 AM
नागरी सहकारी बँका बंद करण्याचं रिझर्व्ह बँकेचं नवं सूत्र, शरद पवारांचं वक्तव्य

रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला शरद पवारांचा विरोध, नागरी सहकारी बँका बंद करण्याचं रिझर्व्ह बँकेचं नवं सूत्र, शरद पवारांचं वक्तव्य 

बहिणीची छेड काढली म्हणून चाकणमध्ये सोळा वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या

बहिणीची छेड काढल्याच्या रागात सोळा वर्षीय मुलांचं अपहरण करून हत्या करण्यात आलीये. मुलीच्या भावासह सात आरोपींचा यात समावेश आहे. पुण्यातील चाकणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. रोहित साहनी असं मयत मुलाचे नाव आहे. सहा सप्टेंबरला अराफत शिकीलकरने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले. रोहित एका हॉटेलसमोर बसला होता.  मन्सूरने तिथून रोहितचं दुचाकीवरून अपहरण केलं आणि चाकण मार्केट यार्डच्या समोरील मोकळ्या मैदानात आणलं. तिथं अराफत आणि त्याचे आणखी पाच मित्र उपस्थित होते. या सर्वांनी मिळून रोहितला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात प्रहार केला तर मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला. यात रोहितची हत्या झाली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूरला अटक केलीये. पण अराफत आणि त्याच्या पाच मित्रांचा शोध सुरुये.

नाशिकसाठी तब्बल 2 लाख 25 हजार 920 लसी प्राप्त

गणेशोत्सवात होणारी गर्दी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल 2 लाख 25 हजार 920 लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये कोविशिल्ड 2 लाख 16 हजार तर कोव्हक्सींन 9 हजार 920 आहेत. नाशिक महापालिकासाठी 71 हजार लसीचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातील सर्वच केंद्रावर लसीकरणाच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील 4 दिवसात एका केंद्रावर कमीत कमी 200 लस उपलब्ध करून द्याव्या असं सांगण्यात आलं आहे. 

नागपुरात जोरदार पाऊस

नागपुरात जोरदार पाऊस सुरु आहे. कालपासून पाऊस सुरुच आहे.आज सकाळपासून खूप अंधारलेले होते. आता पावसाचा जोर वाढला आहे. 


 

औरंगाबाद वाळूज भागात कंपनीमध्ये तोडफोड, गुन्हा दाखल

औरंगाबाद वाळूज भागात कंपनीमध्ये तोडफोड ..कंपनीसमोर भांडण करू नका असे सुरक्षा रक्षकाने सांगितल्याने सहा जणांनी कंपनीच्या केबिनच्या काचा फोडल्या ..पार्किंग मधील दुचाकी खाली पडल्या .. रात्री बाळूज येथील आकार टूल्स कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळील घटना . तरुणांच्या टोळक्या विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

अमरावतीत वर्धा धरणाची पाण्याची पातळी 341.86 मी एवढी असून धरणात एकूण 90% पाणीसाठा

अमरावती : रात्री 10 वाजता अप्पर वर्धा धरणाची पाण्याची पातळी 341.86 मी एवढी असून 90% पाणीसाठा झालेला असून पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढील 48 तासांत केव्हाही पाण्याचा येवा बघता वर्धा नदिचे पात्रात पाणी सोडण्यात येवू शकते. तेव्हा वर्धा नदिच्या काठावर असणाऱ्या गावातील लोकांना सावधगीरी बाळगण्याबाबत आवाहन केलं गेलं आहे.

रत्नागिरीत पावसाची मुसळधार, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. सोमवार अर्थात काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं  जिल्ह्यामध्ये नऊ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर  आता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केले असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्यास सूचना केल्या आहेत. सध्या मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळून, लांजा,  राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यांमधील सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस बरसत आहे. पण सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

पार्श्वभूमी

तळकोकणात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना; 7 आणि 8 सप्टेंबरला जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता


सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेला अतिवृष्टीची पूर्वसूचना द्यावी आणि त्याप्रमाणे आवश्यक ते नियोजन संबंधितांकडून करून घ्यावे, असे निर्देश प्रशासनाच्या वतीनं दिले आहेत.


मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शोध आणि बचावाचं साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. सर्व विभाग, कार्यालय प्रमुखांनी आपापल्या मुख्यालयात हजर रहावं. कोणीही मुख्यालय सोडू नये. आपल्या अधिनस्थ यंत्रणेला देखील तसे आदेश देण्यात यावेत. बांधकाम विभागानं रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित बाजुला करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजनची वाहतूक करणारे मार्ग अखंडितपणे सुरु राहतील यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावं. बंदर विभागानं अतिवृष्टीच्या कालावधीतील भरती–ओहोटीच्या तारखा जिल्हा आणि तालुका प्रशासनास उपलब्ध करून द्याव्यात. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी व डीसीएचच्या ठिकाणी पावसाचे पाणी जावून रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक्षक अभियंता, महावितरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सीसीसी, डीसीएचसी, डीसीएच या ठिकाणी अखंडित विद्युत पुरवठा सुरु राहील यासाठी नियोजन करावं. तसेच कोविड केंद्रांसाठी जनरेटर उपलब्ध करून ठेवावेत. महसूल आणि पोलीस विभाग यांनी आपल्या ताब्यातील बोटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. अतिवृष्टीच्या अनुषंगानं सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला – 02362-228847 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. 


Urban Naxal Case : वरवरा राव यांना तूर्तास दिलासा, प्रकृती अस्वस्थ्यामुळं वैद्यकीय जामीनाची मुदत हायकोर्टानं वाढवली


 शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्यकीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलगू कवी वरवरा राव यांना हायकोर्टानं तूर्तास दिलासा दिला आहे. येत्या 25 सप्टेंबरपर्यंत तपासयंत्रणेला शरण येण्याची गरज नसल्याचं सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. 


आजारपणाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयानं फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कठोर अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच या वैद्यकीय जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वीच शरण येण्याचे निर्देशही दिले होते. येत्या शनिवारी ही मुदत संपत असल्यानं अंतरिम जामीनात मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राव यांच्यावतीने ज्येष्ठ अँड. आनंद ग्रोव्हर आणि अँड. आर. सत्यनारायण यांच्यामार्फत हायकोर्टात दाखल केला होता. त्या अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, राव हे सध्या मालाड इथं भाड्यानं राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याचा दावा त्यांच्यावतीने बाजू मांडताना वकिलांनी केला. त्यामुळे राव यांना हैद्राबाद येथील त्यांच्या निवासस्थाळी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी हायकोर्टाकडे केली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.