Breaking News LIVE : जेईई मेन 2021 चा निकाल आज जाहीर होणार
Breaking News LIVE Updates, 14 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर आज जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबर आणि नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in, ntaresults.nic.in आणि nta.ac.in वर निकाल पाहता येईल.
गर्लफ्रेंड मिळावी यासाठी आमदारांना पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला. पत्राखाली नाव असलेल्या भूषणच्या मित्रांनी सर्व कारभार केल्याचा धक्कादायक खुलासा. भूषणला याबाबत कल्पनाही नसल्याचे उघड, राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून वायरल केले होते. पत्र, आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केले. या कृतीविषयी सर्वांना पश्चाताप असून त्यानी माफी मागितली. आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यांनी युवक शोधून काढल्यावर आमदार धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधला.
राज्य सरकार दिल्ली सरकारचे तिथल्या शाळेचे मॅाडेल स्विकारणार. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर दिल्ली मॅाडलेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राची टिम दिल्लीला जाणार आहे.
पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण प्रामुख्याने पालघरमध्ये जोरदार सरींचा अंदाज. उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट.
विदर्भासाठी सर्वत्र आज यलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाड्यात देखील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट. उत्तर मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज, प्रामुख्याने नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज. पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 18 तारखेला होणार. करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार. करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा अंबाजोगाईचं जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली होती. आपल्याच प्रकरणी करुणा शर्मा यांना जामीन मिळावा म्हणून अंबाजोगाईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी आज होणार होती, मात्र या प्रकरणात फिर्यादी आणि तपास अधिकारी यांचा जवाब नोंदविला गेला नाही, म्हणून न्यायालयानं या प्रकरणावरची सुनावणी अठरा तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. 20 सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढच्या 18 तारखेला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
विधानसभेमध्ये नुकतचं मंजूर झालं आहे की एक सदस्यी प्रभाग समिती असावी. असं असताना जर निवडणूका पुढे ढकलायच्या असतील किंवा ओबीसी आरक्षणासाठी निवडणूका पुढे ढकलायच्या असतील तर गोष्ट वेगळी आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे त्यामुळे ते राज्य सरकारच्या हातात नाही. परंतु ओबीसी आरक्षण असलं पाहिजे असं आम्हांला देखील वाटतं. पण कोणाला तरी आलेला वेडेपणाचा झटका ही काय राज्याची पॉलिसी होऊ शकत नाही. *जी एक सदस्यी प्रभाग समिती आहे ती कायम राहिली पाहिजे अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. बहूसदस्यी प्रभाग समिती राबवणे हा केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. सरकारला आपलं अपयश लपवायचं आहे. ओबीसी आरक्षण केवळ इम्पिरीकल डेटा असेल तर मिळू शकतं. आज सहा महिने झाले अजून यांनी डेटा गोळा करण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू केली नाही, असही संदीप देशपांडे म्हणाले.
नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ओळखीचा गैरफायदा घेत मुलीचं अपहरण केल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यावर लावण्यात आलाय. संशयित आरोपी हा नाशिकच्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
राज्यात 15 ऑक्टोबरपासून उसाच्या गाळप हंगामाला सुरुवात होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय, 15 ऑक्टोबरआधी गाळप झाल्यास कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल होणार
बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा या सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्या परळीमध्ये आल्या होत्या आणि परळीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अंबाजोगाईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनासाठी अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आणि याच जामिनाच्या अर्जावर आज अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. यासर्व प्रकरणानंतर आता करुणा शर्मा यांना आज जामीन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बुलढाणा : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत बुलढाण्यातील केंद्रावर गैरप्रकार. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांकडे एक तासापेक्षा अधिक काळ OMR शिट. उत्तर पत्रिका परत देताना विद्यार्थी कॅमेऱ्यात कैद. बुलढाण्यातील टोमई इंग्लिश स्कुल येथील परीक्षा केंद्रावरील प्रकार. परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांची सारवासारव.
नाशिक पोलीस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा आरोप, संशयित आरोपी हा नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत
रायगड : मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर कंटेनर ट्रेलरची गॅस टँकरला धडक. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बोरघाटात टँकरचा अपघात. टँकरमधून एलपीजी गॅसची गळती झाल्याची शक्यता, केमिकल एक्सपर्ट टीमला पाचारण.
सांगली : कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कृष्णेची पातळी 17 फुटावर असून सायंकाळपर्यत पातळी 30 फुटापर्यंत जाण्याचा पाटबंधारे विभागाचा इशारा दिलाय. कृष्णेची इशारा पातळी 35 फूट आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झालीय, नदीपात्रातील सोमेश्वर धबधबाने रौद्र रूप धारण केले असून धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोसळणाऱ्या धबधब्याचा आढावा घेतलायप्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 32 लाख 89 हजार 579
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 24 लाख 84 हजार 159
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 62 हजार 207
एकूण मृत्यू : चार लाख 43 हजार 213
एकूण लसीकरण : 75 कोटी 22 लाख 38 हजार लसीचे डोस
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 62 हजार 207 रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. 9 सप्टेंबरपासून देशात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासांत 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 37,127 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आपण कुणीही ब्रश करुनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खाननं रविवारी सकाळी ब्रशवर पेस्ट घेतली आणि दात घासण्यास सुरुवात केली. मात्र ती सकाळ अफसानाच्या आयुष्यातली शेवटची सकाळ ठरली. कारण अफसानानं अनावधानानं टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्यासाठी वापरली जाणीर विषारी पेस्ट ब्रशवर घेतली होती. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवल्यामुळं हा धक्कादायक प्रकार घडला आणि यामध्ये अफसाना खानचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जेईई मेन्स परिक्षेतील गैरप्रकाराचे कनेक्शन तपासण्यासाठी काही दस्तावेज ची तपासणी केल्याची माहिती. नागपुरातील आजमशाह चौक व नंदनवन परिसरात 2 कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या टीमने काल चौकशी केली. गेल्या आठवड्यात दिल्ली, जमशेदपूर, इंदूर, बंगळूर आणि पुण्यात काही कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपुरात तपास मोहीम राबविल्याची माहिती. जेईई मेन्स परीक्षेत परीक्षार्थ्यांना निवडक नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी आमिश देऊन काही गैरप्रकार केल्याचं संशय या कोचिंग क्लासेस बद्दल आहे.
अहमदनगर : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बद्दलीनंतरही अडचणीत वाढ. देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करण्यात येणार. आज 11 वाजता जेष्ठ विधिज्ञ असीम सरोदे तक्रार दाखल करणार. देवरे यंची जळगाव येथे झाली बद्दली. देवरे यांची काही दिवसांपूर्वी सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
पार्श्वभूमी
महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, अत्याचारातील नराधमांना वचक बसवा : मुख्यमंत्री
माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री वळसे- पाटील यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध पोलीस आयुक्तालयांचे वरीष्ठ अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यात सगळे उत्सव, कार्यक्रम सहजपणे, उत्साहात साजरे होऊ शकतात. हे केवळ पोलीस सदैव दक्ष असतात म्हणूनच. जनतेची काळजी घेणारे महाराष्ट्राचे रक्षक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्याला साजेसं कामही ते करताहेत. पण दुर्दैवी घटना घडते, सगळेच हादरून जातात. त्यावेळी मात्र काय करावे याची चर्चा सुरु होते. पण घटनांची माहिती घेतली, तर सुन्न व्हावे लागते आणि जनजागृती, लोकशिक्षण करायचं, तर कोणत्या वयापासून आणि केवळ राज्यातल्यांचे की, इतर राज्यातून येणाऱ्यांचं असा प्रश्न उभा राहतो. कोविडच्या संकटातून बाहेर पडताना, आपल्याला अर्थचक्रही सुरु ठेवायचं आहे. पण पोस्ट कोविड परिणाम किती भयंकर असू शकतात हे दिसू लागले आहे. वैफल्यग्रस्तता वाढत आहे, त्याचं आव्हानही आपल्यापुढे आहे. त्यामुळे आता अशा दुर्दैवी घटनांबाबत प्रतिक्रीया देतानाही सजगता बाळगायला हवी. या प्रतिक्रीयांतून आपण काय साधतो आणि आहे ते वातावरण तर बिघडवत नाही, याचा विचार करायला हवा, चुकीचं चित्र रंगवलं जाऊ नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश...
- गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.
- इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात, कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
- जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
- निती आयोगाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.
- शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
- महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.
शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात : गृहमंत्री वळसे-पाटील
गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, "अलीकडच्या काळात राज्यात घडलेल्या घटनामुळे पोलीसांचा वचक आहे की, नाही? अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ही बाब पोलीस दलानं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलीस दलानं अधिक दक्ष आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. कोरोना काळात पोलीस यंत्रणावर विशेष ताण आहे, हे लक्षात घेतलं तरी यंत्रणांनी अधिक सतर्क आणि कार्य तत्पर रहावं. पोलीस स्थानकात आलेल्या महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावे. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावं. अशा न्यायालयीन प्रकरणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा." तसेच, महाराष्ट्र पोलीस दल नावारुपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही त्यांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -