(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जयजीत सिंह ठाणे शहराचे पोलीस आयुक्त
Breaking News LIVE Updates, 24 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात रविवारी 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात काल 29,177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्दैवाने काल 594 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.
आजपर्यंत एकूण 51,40,272 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.12% एवढे झाले आहे. राज्यात आज 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,48,395 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
'आम्ही अॅलोपॅथी विरोधी नाहीत, मी वक्तव्य मागे घेतो', बाबा रामदेव यांचं आरोग्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर
योगगुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे. योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूंमागे अॅलोपॅथी कारण असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहित रामदेव बाबांना वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.
बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'डॉ. हर्ष वर्धन जी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवारांचं कोरोना रुग्णांसोबत नृत्य
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला रोहित पवार यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेह-यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले.रोहित पवारांच्या या डान्सची कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जयजीत सिंह ठाणे शहराचे पोलीस आयुक्त
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, जयजीत सिंह ठाणे शहराचे पोलीस आयुक्त, विनित अग्रवाल यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती तर संजय सक्सेना यांची गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
आज 42,320 रुग्ण बरे होऊन घरी, तर 22,122 नवीन रुग्णांचे निदान
मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान, तर 1,312 रुग्ण बरे होऊन घरी
मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान, तर 1,312 रुग्ण बरे होऊन घरी, मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर, सध्या मुंबईत 28,086 अॅक्टिव्ह रुग्ण
माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो -खासदार संभाजीराजे छत्रपती
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्विग्न प्रतिक्रिया, माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो , मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती करत आहेत राज्य दौरा, 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार, कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात दौरा नाही