Breaking News LIVE : अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
Breaking News LIVE Updates, 14 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

Background
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका
मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड हाती आली आहे. 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्यांना ओबीसी लिस्टमध्ये समावेशाचे अधिकार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय खंडपीठाने दिला होता. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली.या आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत बराच उहापोह झाला होता. खंडपीठाने हे अधिकार आता राज्यांना उरले नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान देत आहे. म्हणजे एक प्रकारे राज्यांना हे अधिकार आहेत असं केंद्राचं सांगणं आहे.
गुरुवारी राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेनं डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. आज राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.34% एवढे झाले आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला
वर्ध्यात आता रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची मंजुरी
वर्धा : वर्ध्यात आता रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने यास परवानगी मिळाली असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांची माहिती. येत्या 15 दिवसात या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती. ब्लॅक फंगस इन्फेक्शनवर याचा वापर होतो . लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार असून केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीला या उत्पादन निर्मितीबाबत विचारणा केली होती . नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणखी एका औषधीची निर्मिती येथे होणार आहे . दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी दिली
























