Breaking News LIVE : आदित्य ठाकरे यांची बैठक सुरू असताना सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, दुर्घटनेत जीवितहानी नाही

Breaking News LIVE Updates, 4 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jun 2021 11:03 PM
आसनगाव रेल्वे स्थानकात शॉक सर्किटने आग
कल्याण - कसारा रेल्वे मार्गावर शहापुर तालुक्यातील आसनगाव रेल्वे स्थानकात रात्रीच्या सुमारास आगीची घटना घडली आहे. तिकीट काउंटरच्या वरच्या भागात शॉक सर्किट झाल्याने आग लागली होती या आगीवर एका तासाच्या आत नियंत्रण मिळवण्यात आलं व मोठी दुर्घटना होता होता टळली आहे .
धुळे बाराफात्तर चौकात गादी कुशन च्या दुकानात भीषण आग

धुळे शहरातील मुख्य भागात असलेले बारा पत्थर चौक येथे मोटारसायकल गादी कुशनच्या दुकानात अचानक आग लागली. मात्र अद्याप आगीचं कारण समजू शकलेले नाही. शहरात रिमझिम पाऊस चालू असताना गादी कुशनच्या दुकानात अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नगरसेवक वसीम बारी यांनी धुळे मनपा अग्निशामक विभागाकडे संपर्क साधला असता काही मिनिटांत घटनास्थळी मनपाचे अग्निशामक बंब पोचले व परिसरातील युवकांच्या मदतीने व धुळे शहर पोलिसांच्या मदतीने ती आग आटोक्यात आणण्यात आली.

आदित्य ठाकरे यांची बैठक सुरू असताना सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, दुर्घटनेत जीवितहानी नाही

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. आज संध्याकाळी 4.45 वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.

वसई विरार महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त प्रेमसिंग जाधव आज सायंकाळी आपल्या घरी परतले 

विरार : 2 दिवसापासून बेपत्ता असणारे वसई विरार महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त प्रेमसिंग जाधव आज सायंकाळी आपल्या घरी परतले ,
कौटुंबिक मानसिक त्रासामुळे कुणाशीही संपर्क न करता, फोन बंद करून, डोंबिवली येथील आपल्या भावाच्या घरी गेले होते. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर यांची माहिती.

आज राज्यात 20,852 रुग्ण बरे होऊन घरी

Breaking News LIVE : आज राज्यात 20,852 रुग्ण बरे होऊन घरी, आज 14,152 नवीन कोरोना रुग्णांचे निदान तर 289 जणांचा कोरोनामुळं मृत्यू #Maharashtra #corona 

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर

मुंबई :-  मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५७० पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विधी तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून विक्रमी वेळेत आपला अहवाल दिल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले व समितीला धन्यवाद दिले


यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, समिक्षा समितीचे सदस्य सचिव वरिष्ठ विधि सल्लागार संजय देशमुख, विधि विधान व संसदीय कार्य विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव, विधि व न्याय विभागाच्या सह सचिव श्रीमती बु. झि. सय्यद, मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲड. आशिष गायकवाड, ॲड.अक्षय शिंदे,ॲड.वैभव सुखदरे, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव  टी.डब्ल्यू. करपते, विधि व न्याय विभागाचे अधीक्षक सुजीत बोरकर उपस्थित होते.

पुढील 2-3 दिवसात मान्सून गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज

पुढील 2-3 दिवसात मान्सून गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. मान्सूनची पश्चिम किनारपट्टीवर कारवारपर्यंत मजल मारली आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटकातील किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस आहे. 

धुळे  जिल्ह्यात काल वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

धुळे जिल्हातील साक्री तालुक्यामध्ये काल संध्याकाळी तब्बल एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तासभर चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतास तळ्याचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले आहे.

वाशिम जिल्ह्यातील लहान मुलांसाठीच्या रुग्णालयाची स्थिती

वाशिम जिल्ह्यात वाशिम शहरात शासकीय  रुग्णालयात 50 बेड लहान मुलांसाठी तयार करणार असून कारंजा इथ शासकीय  रुग्णालयात 25 बेडची व्यवस्था करण्यात आली  आहे तर जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात 200 बेड ची व्यवस्था करण्यात आली असून  जिल्हा प्रशासनाकडे 0  ते 18 वर्षाच्या मुलांची नोंद नाही. 

मेळघाटात पुन्हा अंधश्रद्धेतून बाळाला दिले चटके, प्रकृती गंभीर

तीन वर्षाच्या बालकाच्या पोटाला गरम सळइचे चटके देण्यात आल्याचा संताप जनक प्रकार मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला. मागील एका वर्षातील ही पाचवी घटना आहे. खटकाली गावात एका तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता, त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी त्या बाळाला भोंदूबाबाकडे नेले. त्या भोंदूबाबाने या तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर विळ्याने गरम चटके दिले. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सांगली जिल्ह्यातील ओढ्यातून वाहून गेलेल्या तीनही महिला सुरक्षित

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पुरी आणि पाचापूरमधील ओढ्याला पाणी वाढल्याने तीन महिला वाहून गेल्या होत्या. पण सुदैवाने तीनही महिला सुरक्षित आहेत. एक महिलेला पोहायला येत असल्याने ती लगेच सुखरूप बाहेर आली होती पण इतर दोन महिलांना पोहायला येत नसल्याने त्या तशाच ओढ्यात वाहत गेल्या. पण  स्थानिक ग्रामस्थांनी आणि तरुणाांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना दोन तासानंतर वाचवले. 


 

नाशिकमधील आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर अर्धनग्न आंदोलनाप्रकरणी तब्बल दहा दिवसांनी गुन्हा दाखल

नाशिकमधील आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी मुंबई नाका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 25 मे रोजी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी भावेंना ताब्यात घेतलं होतं. समज देऊन पोलिसांनी करावाई न करताच त्यांना सोडून दिलं होतं. परंतु आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास तब्बल 10 दिवस का लागले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुलडाण्यात पेट्रोल दरवाढीचा परिणाम शेती मशागतीवर 

बुलडाण्यात पेट्रोलचे दर 102.28 रुपये तर डिझेल 92.77 रुपये झाल्याने त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडतोय, त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होतोय. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या अखत्यारीत असलेल्या वस्तूंची महागाई कमी करेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती मात्र या उलट होतांना दिसत आहे, दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहेत तर त्यात महत्वाचे देशासह राज्यात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे.

सोलापूर मनपा क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरु राहणार

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते 2 पर्यंत परवानगी असेल. विशेष म्हणजे दुपारी तीननंतर अत्यावश्यक कारण, वैद्यकीय कारण वगळता नागरिकांना संचार करण्यास बंदी असेल. विनाअत्यावश्यक सेवेतील केवळ एकल दुकानांना परवानगी, शॉपिंग सेंटर, मॉल्स यांना परवानगी नाही. याशिवाय यंत्रमाग, विडी, गारमेंट उद्योगांना देखील सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळत परवानगी असेल. महापालिकेला स्वतंत्र घटक म्हणून मान्यता मिळाल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे आदेश जारी केले. 

बदलापूर एमआयडीसीतील कंपनीत गॅस गळती

बलदापूर : बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीएट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिअॅक्टरमध्ये काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही गॅस गळती झाली. या रिअॅक्टरमध्ये सल्फ्यूरीक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं. मात्र यात सल्फ्युरीक अॅसिड जास्त पडल्यानं अचानक रिअॅक्टरमधून गॅस लिक झाला आणि परिसरात पसरला. हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणं, डोळे जळजळणं असे त्रास होऊ लागले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही गळती रोखली. तसंच रिऍक्टरचं कुलिंग ऑपरेशन केलं. या घटनेत कुणालाही इजा झालेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन विभागाने दिली आहे.

भिवंडीत आगीचे सत्र सुरुच ; शहरातील अवचित पाडा परिसरात भंगारच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी : शहरात अग्नितांडव सुरुच असून हे अग्नीसत्र थांबता थांबत नाही. शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रिच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड ,चिंध्या , पुट्ठे ,प्लस्टिक, तागे ,पीओपी व इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. आगीचे नेमकी कारण अजून समजले नसून या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान या भंगार गोदामांच्या आजूबाजूला रहिवासी घरे आणि यंत्रमाग कारखाने असल्याने आग लागल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून आगीच्या धुराने परिसरातील नागरिक हैराण झाले होते. मात्र या आगिवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. परंतु शहरात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने या आगी लागतात की लावल्या जातात, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय

पार्श्वभूमी

Maharashtra Unlock : अनलॉकबाबत गोंधळात गोंधळ! 'राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत', मंत्री वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर सरकारचं स्पष्टीकरण


Maharashtra Lockdown : राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. 


राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत


कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.


अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असं माहिती व जनसंपर्क विभागाकडून आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. 


Maharashtra Lockdown : मंत्री वडेट्टीवारांचा यू टर्न!, म्हणाले, '5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील'


Maharashtra Lockdown : राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यू टर्न घेतला आहे. अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात म्हटलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.