Breaking News LIVE : सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चा प्रकरणी 46 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई
Breaking News LIVE Updates, 05 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गेल्या आठवडाभरापासून हुलकावणी दिलेल्या पावसाने आज नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील अनेक ठिकाणी कुठे जोरदार तर कुठे कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या भरवश्यावर अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पीक उन्हामुळे करपू लागली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते तर काही ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या पावसावर पेरण्या केल्या मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस लांबला होता. आज दुपार नंतर सटाणा,मालेगाव,येवला तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले तर मनमाड आणि परिसरात काही वेळा पुरती पावसाने हजेरी लावली.
पंढरपूर : कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारीवर निर्बंध आल्याने आज योगिनी एकादशीला राज्यभरातील हजारो वारकर्यांनी येऊन विठुरायाच्या कळसाचे आणि नामदेव पायरीचे दर्शन घेत आषाढी यात्रेचा आनंद घेतला . आषाढी सोहळ्यासाठी 17 जुलै पासून 25 जुलै पर्यंत शासनाने परवानगी दिलेल्या भाविक शिवाय कोणालाही पंढरीत प्रवेश असणार नसून हा संपूर्ण कालावधीत पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदी असणार आहे . यामुळे आषाढी सोहळ्याला सर्वसामान्य भाविकाला येत येत नसल्याने आज योगिनी एकादशीला भाविकांनी गर्दी केली आहे . आजच्या योगिनी एकादशी नंतर 15 दिवसांनी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे . यामुळेच मराठवाडा , विदर्भ , कोकण या भागासह कर्नाटक , आंध्रप्रदेश , तामिळनाडू या भागातील हजारो भाविकांनी योगिनी एकादशीला दर्शनासाठी गर्दी केली आहे . 18 जुलै पासून 25 जुलै पर्यंत चंद्रभागेच्या स्नानाची करता येणार नसल्याने आज योगिनी एकादशीला चंद्रभागा वाळवंट वारकर्यांनी फुलून गेले होते . काही विठ्ठल भक्तांनी मंदिर परिसरात रांगोळ्यांच्या पायघड्या घालत देवाची सेवा केली . देवा दोन वर्षे आषाढी चुकली आता तरी या कोरोना संकटाचा नामशेष करून पुढील आषाढीला माऊली पालखी संगे पायी वारी करू दे असे साकडे वारकरी देवाला बंद मंदिराबाहेरून घालत होते.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. त्यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अनिल देशमुखांचे वकील इंदरपाल सिंह हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि लगतच्या नऊ गावात संचारबंदी पुकारण्यात आली आहे. 17 ते 25 जुलै दरम्यान ही संचारबंदी लागू राहणार आहे तर 18 ते 25 जुलै दरम्यान चंद्रभागा स्नान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. वाखरी ते इसबावी दरम्यान परवानगी देण्यात आलेल्या 10 पालखांच्या प्रतिनिधींना पायी चालण्यास परवानगी आहे. या वारीत सहभागी वारकरी आणि पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
स्वप्नील लोणकर आत्महत्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
गेल्या काही दिवसांपासून दररोज इंधन दरवाढ सुरू सुरू आहे. या वाढत्या महागाईमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती वापरातील गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे आणखी जास्त हाल केले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील खारबांव येथे भिवंडी- वसई मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्याच्या वतीने रास्ता रोको करुन जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती
अकोला : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने फक्त दोन दिवसांचं विधीमंडळ अधिवेशन बोलविण्याचा भाजपाच्या वतीने निदर्शने करीत निषेध. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची निदर्शने. महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी.
बुलढाणा जिल्ह्यातील 61 कोविड सेंटर आणि जिल्ह्या सामान्य रुगालयातील एन आर एच एम अंतर्गत कंत्राटी 3 आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यापासुन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हेकेखोर पणामुळे रखडले आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता रखडेलेले वेतन द्या अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
परभणी : औंढ्याच्या सिद्धेश्वर धरणातून वसमतला पाणी पुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन गोळेगाव जवळ फुटली आहे. त्यामुळे नांदेड-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. मात्र वसमत नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येतआहे.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी काँग्रेस पक्षात मोठ्या बदलांचे संकेत, लोकसभेत गटनेते पदासाठी राहुल गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा , राहुल गांधी गटनेते झाल्यास अध्यक्षपदी नवा चेहरा देण्याची शक्यता
राजकारणात मार्ग बदलतात, पण मैत्री कायम राहते. मैत्री असली म्हणजे आम्ही भाजपसोबत सरकार बनवणार असा अर्थ होत नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसेच भारतीय नागरिकांचा डीएनए एकच, जात-धर्म येत नाही या मोहन भागवतांच्या मी विधानाशी सहमत आहे, असंही संजय राऊत बोलताना म्हणाले.
राजेश सापते प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मिस्त्री नरेश विश्वकर्माला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि नरेश विश्वकर्मा असे दोघे अटकेत आहेत. उर्वरित तिघांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलीस मुंबई पोलिसांची ही मदत घेत आहे.
राज्यातील जी 30 साखर कारखाने एमएससीने विकले ज्याची चौकशी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यात गडकरींचे मुलं डायरेक्टर असलेल्या दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. आपण चौकशी करताना कुठला ही दुजाभाव करत नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न ही यादी देताना दादांचा असेल, मात्र त्यामुळे भाजपच्या प्रादेशाध्यक्षांनी भाजपच्या एका हेवी वेट केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर केला नाहीये ना ह्या चर्चेला मात्र उधाण आले आहे
एमपीएससी उत्तीर्ण होऊन ही नोकरी नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर याचा निषेध करत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून विधानभवनाच्या दिशेनं निघाले आहेत. पायी निघालेल्या या मोर्च्या मध्ये मनसेचे 150 ते 200 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सरकारचा निषेध करत आम्ही आता विधानभवनाच्या दिशेनं निघालो आहोत असं ते म्हणाले.
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार झाला असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. 'वारे शिवसेना सरकार' या आशयाखाली हे बॅनर लावले आहेत. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या ओएसडी यांनी बोगस कॉलेज वाटल्याचे या बॅनरवर म्हटलं गेले आहे. सात हजारांची एफडी सात लाखांची दाखवली असं ही म्हटलं गेले आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आज सीईओपद सोडणार आहेत. अंतराळ पर्यटनाकडे लक्ष केंद्रीत करणार असून अॅमेझॉनला नवा सीईओ मिळणार आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सुरुवात होणार का? याबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. खाजगीत, सोशल मीडियावर आणि जो जिथे भेटला तिथे हीच चर्चा सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील 98 दारूविक्रीचे परवाने पुन्हा एकदा बहाल केले आहे आणि दारूविक्रेत्यांना हे परवाने देण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी सर्व स्टॉकिस्टची दुकानं बंद असल्याने दारू मागवता आलेली नाही. त्यामुळे आज दुपारपर्यंत स्टॉकिस्टकडून माल चंद्रपुरात आला तर दारूविक्री अधिकृतपणे सुरु होऊ शकते. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत अजून देखील अधिकृतपणे बोलण्यास तयार नसल्याने दारूविक्री नक्की कधी सुरु होणार याबाबत संभ्रम कायम आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्व दुकानदारांना पाच दिवसांचा दिलासा मिळाला आहे. आजपासून 9 तारखेच्या चार वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती.
औरंगाबाद : औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार झाला, असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. वारे शिवसेना सरकार या आशयाखाली हे बॅनर लावले आहेत. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या ओएसडी यांनी बोगस कॉलेज वाटल्याचे या बॅनरवर म्हटलं गेले आहे. 7 हजारांची एफडी 7 लाखांची दाखवली, असंही म्हटलं गेले आहे. हे सर्व ओएसडी सचिन सानप यांनी केले असल्याचं या बॅनरवर म्हटलं आहे.
पार्श्वभूमी
ऐहिक पारलौकिक फळ देत असताना इहलोकातील सर्व भोग प्राप्त करून देणारी आणि मुक्ती प्राप्त करून देणारी तिथी म्हणजे योगिनी एकादशी, असे या दिवसाचे वर्णन केले जाते. सत्ता संपत्ती यामध्ये सत्ता आल्यावर संपत्ती येते किंवा संपत्ती आल्यावर सत्ता देखील येऊ शकते. मात्र सत्ता आणि संपत्ती हे दोन्ही मिळाल्यावरही समाधान मिळत नाही. यासाठीच वारकरी सांप्रदायात एकादशीचे व्रत हे समाधान प्राप्तीसाठी सांगितले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार,
सदा नामघोष करी हरिकथा!
तेणे सदा चित्ता समाधान!!
एकादशीला हरिकथा आणि नामस्मरण केल्यास चित्तास समाधान प्राप्त होते. योगिनी म्हणजे योग्य अर्थात जोडणारी. परमात्म्याशी जोडणे ज्या व्रताने घडते, ती ही योगिनी एकादशी होय. सगुण भगवंताची गाठ पडणे आणि जीवब्रम्ह ऐक्य होणे, हे या तिथीला होते. म्हणून जीवब्रम्हाचे ऐक्य प्राप्त करून देणारी एकादशी म्हणजे ही योगिनी एकादशी होय. आपण केलेल्या सेवेने 88 हजार ब्राम्हण तृप्त होऊन जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य या योगिनी एकादशीच्या व्रताने मिळते, अशी मान्यता आहे.
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत. यंदा पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम झाला नाही, कोरोनामुळं हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळाली मात्र परंपरा मोडीत काढत पूर्वसंध्येला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील झाली नाही. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने मात्र पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.
रविवारी राज्यात केवळ 3,378 रुग्णांना डिस्चार्ज तर 9,336 नवीन रुग्ण
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात काल (रविवारी) केवळ 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस हळू हळू वाढू लागल्या आहेत. अॅक्टिव्ह केसेस आता एक लाख 23 हजारांच्या वर गेल्या आहेत. काल मालेगाव आणि गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1461 तर कोल्हापूर शहरात 389 असे एकूण 1850 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सांगलीचा आकडाही हजारांच्या वर नोंदवला आहे. आज 38 मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -