Breaking News LIVE : पालघर : चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती

Breaking News LIVE Updates, 11 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2021 10:33 PM
रायगड : मुरूड तालुक्यातील काशीद येथील नाल्यावरील लहान पूल कोसळला, एकाचा मृत्यू

रायगड : मुरूड तालुक्यातील काशीद येथील नाल्यावरील लहान पूल कोसळला, अपघातात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू, विजय चव्हाण याचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसात बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून, बिलोली तालुक्यातील घटना

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसात बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून, बिलोली तालुक्यातील घटना.

पालघर : चिंचणी बीचवर मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती

पालघर जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी असून आज रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर काही पर्यटक बाहेरून पर्यटनासाठी आले होते. हे पर्यटक मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळून आल्यावर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. मात्र, ह्या मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याचे समोर आले आहे. सध्या चिंचणी खाडी नाका पोलीस चौकीमध्ये कारवाई सुरू आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी..

बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी.. बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं, मात्र मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आज दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपात तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे

कोल्हापूर : राज्य सरकारने व्यापाऱ्यांची परीक्षा न बघता दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, ललित गांधी यांचं आवाहन

कोल्हापूर : व्यापाऱ्यांमुळे कोल्हापुरातील कोरोना वाढत नाही हे सिद्ध झालं आहे. पाच दिवस दिलेल्या परवानगीमध्ये जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढली नाही. राज्य सरकारने व्यापाऱ्यांची परीक्षा न बघता लवकरात लवकर आदेश काढावेत. व्यापाऱ्यांची उद्यापासून दुकाने सुरू करण्याची सर्व तयारी झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांचं आवाहन

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पावसाने जिल्ह्यात जोरदार सुरुवात

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पावसाने जिल्ह्यात जोरदार सुरुवात केली आहे. चिपळूणमधल्या वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातील बाजारपुलाला पाणी लागले आहे..

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्याने वाहतूक ठप्प

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

आषाढी यात्रेपूर्वीच बंद विठ्ठल मंदिराबाहेर शेकडो वारकरी

आषाढी यात्रेपूर्वीच बंद विठ्ठल मंदिराबाहेर शेकडो वारकरी, आषाढी पूर्वीच केली आषाढी यात्रा पोच

ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन
महाराष्ट्रातील ज्येष्ठ गझलकार, पत्रकार, सिंधुदुर्गचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक गझल मुशायऱ्यांमध्ये नानिवडेकर सहभागी असत. अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 'चांदणे नदीपात्रात' हा त्यांचा गझलसंग्रह प्रचंड गाजला होता. काही काळ त्यांनी दै. पुढारी सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये उपसंपादकपदी काम पाहिले होते. महाराष्ट्र टाईम्स चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून सध्या ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या मिश्किल आणि विनोदबुद्धीने त्यांचे सर्व क्षेत्रांत सर्वांशी आपुलकीचे संबंध होते. 

 

गझलकार सुरेश भट यांच्या गझलेचा वारसदार म्हणून नानिवडेकर यांना ओळखले जाई. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या अनेक गझला आपल्या जाहीर कार्यक्रमात सादर केल्या होत्या. त्यांच्या 'निघावयास नानिवडेकर हरकत नाही' या गझलेवर तर कैकजण फिदा होत असत. जणू आयुष्याच्या रेषेचे घड्याळ नियतीने पाहिले आणि मधुसूदन नानिवडेकर यांनी निघावयास हरकत नाही, असे म्हणत आपल्या गझलेतील शब्दांप्रमाणेच इहलोकातून एक्झिट घेतल्याची भावना साहित्यप्रेमींतून व्यक्त होत आहे. गझलकार नानिवडेकर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.
आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या, मानसेवी डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यांत काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली आहे. या पत्रात मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचाही उल्लेख केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांचा रस्त्यावर उतरून आंदोलन

लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांचा रस्त्यावर उतरून आंदोलन, सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी आरोग्य केंद्र येथील प्रकार,


पहाटे पासून रांगा लागून थांबल्यानंतर देखील लस मिळत नसल्याचा आरोप,


दुसरीकडे लसीकरण झाल्याशिवाय किंवा कोरोना चाचणीशिवाय कामास परवानगी नाही,


शहरात मागील महिन्याभरात अंत्यत तुरळक आणि अनियमित लसीकरण,


त्यामुळे संतापलेल्या महिलांनी रस्त्यावर उतरून केलं आंदोलन, पोलिसांनी मध्यस्थी करून महिलांची समजूत काढल्याने आंदोलन मागे,

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे कंटेनरचा भीषण अपघात

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण येथे कंटेनरचा भीषण अपघात चालकाचा कंटेनर खाली दबून मृत्यू. मेंढवन जवळ नेहमीच्या धोकादायक वळणावर काच वाहून नेणाऱ्या कंटेनर वरील चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडला असून चालकाने केबिन मधून उडी मारल्यावर तो कंटेनरखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनरची केबिन जवळपास तीनशे मीटर दूर जाऊन रोडच्या खाली गेली सध्या गुजरात वरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बायपास रोड निवडण्यात आली आहे घटनास्थळी वाहतूक पोलिस यंत्रणा दाखल असून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरु आहे. 

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अधिकच्या विशेष गाड्या सोडा, आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली. कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात.

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 

आज सकाळी हिंगोली जिल्ह्यातील 8.35 मिनिटांनी औंढा, कळमनुरी, वसमत तालुक्यातील अनेक गावांत सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. दहा सेकंद तर कुठे 30 सेकंदापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत काही गावात तर आवाजही झाल्याची माहिती मिळते आहे. 

बंडातात्या कराडकर स्थानबद्ध मात्र समर्थक वारकरी पताका घेऊन पंढरीत; देहू आळंदीकरांची पायी वारी झालीच

पंढरपूर : कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला पायी वारी काढण्यास शासनाने मज्जाव केल्यावरही शेकडो वारकरी ८ दिवसात देहू आणि आळंदी येथून पायी वारी करीत पंढरपूरला पोचले असून बंडातात्या कराडकर याना जरी शासनाने स्थानबद्ध केले असले तरी त्यांची पताका व ताल घेऊन समर्थक वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत . कोरोना संकटामुळे पायी वारी नाही असा आदेश शासनाने काढला असून 17 ते 25 जुलै कालावधीसाठी संचारबंदी लागू केली आहे . मात्र शेकडो वर्षांपासून घरात वारी असणारे पारंपरिक वारकर्यांनी आपला पायी वारीचा नियम न मोडता देहू आणि आळंदी येथून पायी वारी चालत पंढरपूर गाठले आहे . हे निष्ठावान वारकरी आळंदी आणि देहू येथून आठ दिवसात पायी चालत पंढरपूरमध्ये पोचले आहेत . पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकर याना प्रस्थानादिवशी प्रशासनाने नजरकैद केल्याचा आरोप करीत त्यांचे समर्थक वारकर्यांनी बंडातात्या यांची पताका आणि टाळ  पायी चालत पंढरपूर पर्यंत आणून त्यांचा पायी वारीचा संकल्प पूर्ण केल्याचे भानुदास वैराट यांनी सांगितले . रोज ४९ ते ५० किलोमीटरची पायपीट करीत आणि कोरोनाचे नियम पाळत हे वारकरी आषाढीपूर्वीच आपली वारी पोच करीत असल्याने वारकर्यांनाही वारी केल्याचा आनंद आणि समाधान मिळत आहे . पंढरपुरात शिखराचे दर्शन घेऊन हे वारकरी परत आपल्या गावाकडे परतत आहेत

Gold Silver Price Today :  सोन्याचा दर 'जैसे थे'; चांदी 500 रुपयांनी महाग

Gold Silver Price Today : सलग तीन दिवासांच्या घसरणीनंतर चांदीच्या दरात आज 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदीसाठी 69,300 रुपये मोजावे लागणार आहेत. तुलनेत सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,810 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,810 रुपये इतका आहे. 

रत्नागिरी : रिफायनरीचा मुद्दा, नवीन जागेवरून विरोधक आणखी आक्रमक; गावागावात रिफायनरीला विरोध करणारे फलक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरीचा मुद्दा मागील तीन ते चार वर्षापासून गाजतोय. पण, नाणार ऐवजी राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगांवचा मुद्दा चर्चेत आला आणि याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत. दरम्यान, रिफायनरी विरोधकांनी आपला विरोध आणखी तीव्र केला असून गावागावात तसे फलक लावले गेले आहेत. या फलकावर आमचे गाव कट्टर रिफायनरी विरोधी आहे. 'रिफायनरी समर्थनार्थ जमीन दलाल, राजकीय नेते वा अन्य कुणीही प्रचार करण्यास येऊ नये. कोणी जबरदस्तीनं आल्यास त्या कृतीस ती व्यक्ती सर्वस्वी स्वत: जबाबदार असेल' असा सुचना वजा इशारा देणारा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रिफायनरी या विषयावरून कोकणातील वातावरण आणखी गरमागरमीचं होणार आहे. 

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती

  • मुंबईमध्ये आज पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 97.46 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत आज पेट्रोल 101.67 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर

  • कोलकातात आज पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर

  • बंगळुरुमध्ये आज पेट्रोल 104.29 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर

  • चंदीगडमध्ये आज पेट्रोल 97.04 रुपये आणि डिझेल 89.51 रुपये प्रति लिटर

  • लखनौमध्ये आज पेट्रोल 98.01 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रति लिटर

  • रांचीत आज पेट्रोल 95.96 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर

  • पाटनात आज पेट्रोल 103.18 रुपये आणि डिझेल 95.46 रुपये प्रति लिटर

  • भोपाळमध्ये आज पेट्रोल 109.24 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today 11 July : देशात आज इंधनांचे दर स्थिर, कोणतीही वाढ नाही

Petrol Diesel Price Today 11 July : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरु असतानाच आज काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. एका दिवसापूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैसे आणि 26 पैसे प्रिती लिटर वाढ करण्यात आली होती. 

नांदेडला भूकंपाचे दोन धक्के

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजून 32 मिनिटांनी भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवले. भूगर्भातून गडगडाट असा आवाज होत 6 सेंकंदाचा धक्का जाणवलाय तर दुसरा धक्का 8 वाजून 42 मिनिटांनी जाणवले. सकाळी अचानक सुरू झालेल्या या भूगर्भीय हालचालीमुळे व आवाजामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बुलढाण्यात पावसाला सुरुवात

जिल्ह्यात आज सकाळी 6 वाजल्यापासून सर्वच तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून, सकाळपासूनच काळं कुट्ट आभाळ जिल्हाभरात आहे.  सर्वत्र रिपरिप पाऊस सुरू असून जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र जिल्हावासियांना अजूनही आहे.

Copa America 2021 final : 28 वर्षांनी अर्जेंटीनाची विजयाला गवसणी; अंतिम सामन्यात ब्राझीलचा पराभव

Copa America 2021 final : अर्जेंटीनाने कोपा अमेरिका 2021 चा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघानं आर्क रायवल्स ब्राझीलचा 1-0 नं परभाव केला. अर्जेंटीनाने जवळपास 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपलं नाव पटकावलं आहे. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता. 

बीडमधील राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा पंकजा मुंडेंकडून प्रयत्न : राजेंद्र मस्के

बीड : सात तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्याने बीड जिल्ह्यामध्ये भाजपचे अनेक पदाधिकारी राजीनामे देऊ लागले आहेत. कालपासून जवळपास 36 पदाधिकाऱ्यांनी संतप्त होऊन आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या राजीनामा सत्रानंतर पंकजा मुंडे यांच्याकडून आता त्यांची समजूत काढली जात असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने अनेक कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र असल्या तरी मंत्रीपद बाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

पार्श्वभूमी

गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची चिखलात उतरून भात रोवणी; आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्याचे आवाहन


गडचिरोली : जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला साखरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी चक्क चिखलात उतरून भात (धान) लागवड केली. श्री पद्धतीने भात लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले.


जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यातील दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला जिल्ह्यात सुरुवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे असे आवाहन शेतकऱ्यांना केले. परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे ते यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.


Maharashtra Corona Update : राज्यात काल (शनिवारी) 8296  नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 6026 रुग्ण कोरोनामुक्त


राज्यात काल (शनिवारी) 8 हजार 296  नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 06 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के आहे. 


राज्यात गेल्या 24 तासात 179 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. चार जिल्ह्यामध्ये कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आली आहे. यामध्ये यवतमाळ (20 ), हिंगोली ( 80 ), गोंदिया ( 81 ) नंदूरबार (97 ) या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.