Breaking News LIVE : रात्रीच्या संचारबंदीच्या केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होणार

Breaking News LIVE Updates, 29 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Aug 2021 04:22 PM
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट बनवलं जातंय- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट बनवलं जातंय. महाविकास आघाडी सरकारलाच टार्गेट केलं जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची टीका.

धारावी परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने १६ जण जखमी

धारावी परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने १६ जण जखमी आहे, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी गॅस बाटलासंदर्भात कठोर निर्णय घ्यावे लागतील असे सांगितले.

रात्रीच्या संचारबंदीच्या केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होणार

रात्रीच्या संचारबंदीच्या केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होणार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. केरळपाठोपाठ राज्यातही रात्रीची संचारबंदी.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये शेतकरी जनजागृती परिषद

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी 3 काळे कायदे आणि प्रीपेड विजबिल विधेयका विरोधात नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरातील नाशिक कृषि उत्पन्न उपबाजार समितीत थोड्याच वेळात भव्य शेतकरी जनजागृती परिषदेला सुरुवात होणार असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय किसान सभा, बहुजन शेतकरी संघटना, किसान कॉंग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, आम आदमी किसान सेल, राष्ट्रसेवा दल, राष्ट्रवादी शेतकरी संघटना आणि शेतकरी सेना या  संघटनांमार्फ़त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडीत  मोठ्या प्रमाणात गांज्याची पोती पोलिसांकडून जप्त

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडीत  मोठ्या प्रमाणात गांज्याची पोती पोलिसांकडून जप्त, 


50 लाख किमतीचा 5 टन गांजा असल्याची प्राथमिक माहिती...


पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे आणि पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाची कारवाई....


शंकरवाडी येथील उसाच्या शेतात सापडले गांज्याची पोती...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये शेतकरी जनजागृती यात्रा

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन कायदे आणि प्रीपेड विजबिल विधेयका विरोधात नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरातील नाशिक कृषि उत्पन्न उपबाजार समितीत भव्य शेतकरी जनजागृती परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित आहेत. अखिल भारतीय किसान सभा, बहुजन शेतकरी संघटना, किसान कॉंग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, आम आदमी किसान सेल, राष्ट्रसेवा दल, राष्ट्रवादी शेतकरी संघटना आणि शेतकरी सेना या  संघटनांमार्फ़त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत.

सख्खे भाऊ-बहीण बेपत्ता, नीरा कालव्यात वाहून गेले असण्याची शक्यता 


सातारा जिल्ह्यातील रुई येथील घटना, 


सख्खे भाऊ-बहीण बेपत्ता 


चार वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता 


नीरा कालव्यात वाहून गेले असण्याची शक्यता 


आशिष राणे , ऐश्वर्या राणे अशी या चिमुकल्यांची नावे


काल सायंकाळपासून शोध सुरू

राजूर घाटातील हनुमान मंदिरावर अस्वलाचा बिनधास्त फेरफटका

बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटातील हनुमान मंदिरावर पुन्हा एकदा अस्वलाचे दर्शन झाले आहे. येथील डॉ. विनायक हिंगणे आपल्या कुटुंबासह घाटात फिरायला गेले असतांना शनिवार, रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांना हे धिप्पाड अस्वल दिसले. त्यांनी कारमधून या अस्वलाचा मुक्त संचार आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. ते मुलांना घेऊन कार मधून बाहेर फिरायला गेले असता त्यांना मंदिराजवळ अस्वल दिसले. ते अस्वल कारच्या प्रकाशाला घाबरले नाही. इतर कार सुद्धा रस्त्याने जात होत्या मात्र ते शांतपणे नारळ शोधत होते. डॉक्टरांनी 5 मिनिटे कार उभी ठेवली पण त्याला या अस्वलाला फरक पडला नाही.

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार जयंत पवार यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार (Marathi Writer Jayant Parwar) यांचं निधन झालं आहे. जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते.


पवार यांनी लिहिलेल्या नाटकांनी तसेच कथांनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला आहे. पवार यांचा फीनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहाला साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट बनला आहे. तसेच ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला आहे.

पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं उंचावली देशाची मान; रौप्य पदाकावर कोरलं नाव

भारताच्या भाविना पटेलनं टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. सुवर्णपदाचं स्वप्न अधुरं असलं तरी भविनानं रौप्य पदक कमावत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भविना भारताची पहिली  खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भविनाकडे सुवर्ण पदक कमावण्याची संधी होती. परंतु, अंतिम सामन्यात चीनच्या यिंगनं तिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचं सर्रासपणे उल्लंघन
नाशिक : एकीकडे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कालच केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला सूचना करण्यात आल्या असतांना दुसरीकडे मात्र केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांच्याच जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याने नाशिक पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात्रेचे आयोजक नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवेंविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल दुपारी शहरातील पाथर्डी फाटा परिसरातून निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेत भारती पवारांसोबत माजी मंत्री जयकुमार रावल आणि ईतर स्थानिक नेतेमंड़ळी उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तूफान गर्दी केली होती तसेच फटाक्यांची आतिशबाजी आणि ढोल ताशाचा गजर करत स्वागत करण्यात येत होते. रात्री 10 वाजता काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर रामनामाचा जयघोष करत यात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबाबत पवारांना माध्यमांनी विचारणा केली असता कोरोनाचा धोका लक्षात घेता सर्व खबरदारी आमच्याकडून घेतली गेली होती अस त्यांनी म्हंटलय.
पंढरपुरामधील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपी तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड

नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी थेट कर्नाटकमधील म्हैसूर येथून शिताफीनं अटक केली. तब्बल साडेतीन वर्ष या आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला होता.  पंढरपूर शहरातील भरवस्तीत असलेल्या भागात 18 मार्च 2018 रोजी नगरसेवक संदीप दिलीप पवार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. संदीप पवार हे स्टेशन रोड वरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असताना अज्ञात लोकांनी कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निघृण खून केला होता.


सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीनं हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खून प्रकरणातील एकूण 27 आरोपींपैकी 24 आरोपींना पोलिसांनी अटक करून या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. 

पार्श्वभूमी

National Sports Day : आज 'राष्ट्रीय खेळ दिवस'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस


भारतात ज्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी भारतीय हॉकीचे सुवर्णयुग सुरु होतं. त्यावेळी भारतीय संघात असा एक खेळाडू होती कि ज्याची किर्ती जगभर पसरली होती. या खेळाडूचे हॉकीतील कौशल्य असं होतं की, त्याच्या हॉकी स्टिकला बॉल चिकटला आहे का हे विदेशी लोक तपासायचे. हा खेळाडू म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यान चंद. आज त्यांचा जन्म दिवस. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भारतात आज राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात येतोय. 


भारत देश गुलामीत होता त्यावेळी भारताची विदेशातील ओळख म्हणजे गांधी, हॉकी आणि ध्यानचंद अशीच होती. मेजर ध्यानचंद अर्थात ध्यानचंद सिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रुपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले


भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.


हिटलरनं मागवली हॉकी स्टिक


मेजर ध्यानचंद यांच्या जीवनात 1936 चे बर्लिन ऑलिम्पिक हे सर्वात महत्वाचं होतं. या स्पर्धेत भारताचा अंतिम सामना थेट जर्मनीशी होता. हा सामना बघण्यासाठी स्वत: हिटलर हजर होता. पण त्यामुळे ध्यानचंद यांच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय संघाने लागोपाठ गोल करायला सुरु केल्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची हॉकी स्टिक तपासण्यासाठी मागितली होती.


जर्मनी संघाला हारताना हिटलर पाहू शकत नव्हता. त्याने पहिल्या हाफ मध्येच मैदान सोडलं. पण धानचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली. पण ध्यानचंद यांनी ती ऑफर विनम्रपणे नाकारली. 


मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले, जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. 


पंढरपुरामधील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपी तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड


नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी थेट कर्नाटकमधील म्हैसूर येथून शिताफीनं अटक केली. तब्बल साडेतीन वर्ष या आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला होता.  पंढरपूर शहरातील भरवस्तीत असलेल्या भागात 18 मार्च 2018 रोजी नगरसेवक संदीप दिलीप पवार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. संदीप पवार हे स्टेशन रोड वरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असताना अज्ञात लोकांनी कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निघृण खून केला होता.


सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीनं हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खून प्रकरणातील एकूण 27 आरोपींपैकी 24 आरोपींना पोलिसांनी अटक करून या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. 


उर्वरित फरार तीनपैकी सुनील वाघ आणि संतोष देवमारे हे दोघे आरोपी कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून आणि वेषांतर करून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी म्हैसूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. काल (शनिवारी) या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी गेले साडे तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देत आधी कोल्हापूर, बेळगाव आणि नंतर कर्नाटकातील म्हैसूर येथे राहत होते. या आरोपींची आपल्या कुटुंबाशीही थेट संबंध न ठेवल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र उशिरा का होईना पोलिसांनी मोक्का मधील या आरोपीना जेरबंद केल्यानं आता या हत्या प्रकरणात केवळ एका आरोपीचा शोध बाकी राहिला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.