Breaking News LIVE : अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील विरुळ (रोंघे) शिवारात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 18 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Aug 2021 11:25 PM
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील विरुळ (रोंघे) शिवारात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील विरुळ (रोंघे) शिवारात बैलगाडीसह शेतकरी वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड! स्थायी समितीची आजची बैठक संपताच एसीबीची कारवाई सुरू

पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड. स्थायी समितीची आजची बैठक संपताच एसीबीची कारवाई सुरू. स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला. नेमकी कोणावर आणि किती रुपये ताब्यात घेतले याबाबतची माहिती गुलदस्त्यात. पण कारवाईने महापालिकेत खळबळ. स्थायी समितीची आज बैठक असल्याने इमारतीत ठेकेदारांची गर्दी आहे. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांनाही ताब्यात घेतलं आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. 
उमेश रघुनाथ खोसे सहशिक्षक जि.प.प्रा. शाळा जगदंबानगर कडदोरा, जिल्हा - उस्मानाबाद.
शेख खुर्शीद कुतबुद्दीन, जि.प.प्रा.शाळा असरअली ता. सिरोंचा जि. गडचिरोली

आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज


आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार आहे. परवापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा, तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी आज आॅरेंज अलर्ट, आज सकाळी 8.30 पर्यंत उमरखेडमध्ये 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशकातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीवरून ते पुण्यात आले आणि त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. चार दिवसांपूर्वी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील घरात काम करणारा एक व्यक्ती ही पॉझिटिव्ह आढळला आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार

पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती यामध्ये एक गंभीर जखमी झाली आहे. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्याने स्वतःला पेट्रोल का घेतले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही..


पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीचे नाव देखील अद्याप समोर आले नाही. त्याला तातडीने गंभीर जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट

पंढरपूर : शेकापचे दिवंगत जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी गणपतराव यांच्या पत्नी रतन बाई आणि मुले पोपटराव आणि चंद्रकांत देशमुख यांच्याशी चर्चा केली. आपला आणि कै. गणपतराव देशमुख यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच पूर्वी दोन वेळा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला खूप मोठ्या आघाडीने निवडून दिल्याची आठवण आठवले यांनी सांगितली. 

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरु करण्यावरून राजकारण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरु करण्यावरून राजकारण. गणेशोत्सवाच्या आधी सुरु करू अशी घोषणा राणे आणि राऊत यांच्याकडून झाल्यानंतर अध्यापही विमानतळाला लायसन्स मिळालेलं नाही. जाणून बुजून मीच तो मोठा म्हणून सांगण्याची ज्याना सवय आहे. तेच यात हस्तक्षेप करत असल्याचा संशय येत असल्याचं सांगत, विनायक राऊत यांनी नारायण राणेवंर नाव न घेता टोला हाणला आहे. चिपी विमानतळाची काम शंभर टक्के पुर्ण, राणेंच्या काळात मात्र 15 टक्केच विमानतळाच काम झालं होतं. डिजीसीएच्या माहितीनुसार विमानतळाच्या लायसेन्स मिळायला हरकत नाही, धावपट्टी आणि विमानतळ 100 टक्के काम पूर्ण. राजकारण करण्यासाठी जाणूनबुजून विमानतळाला मिळणार लायसन्स ला विलंब केला जात असल्याचा संशय विनायक राऊतांनी व्यक्त केला आहे. 

नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडीकल कॉलेज, हॉस्पिटलमध्ये काल एका एम डी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, डॉक्टर स्वप्निल शिंदे असे मयताचे नाव,  दोन सीनियर मुलींकडून रॅगिंग केली जात होती आणि या त्रासाला कंटाळून मुलाचा घातपात झाल्याचा स्वप्निलच्या कुटुंबियाचा आरोप,  छळ होत असल्याबाबत कॉलेज प्रशासनाला याआधी देखील कल्पना दिली होती मात्र दुर्लक्ष केल्याचाही आरोप,  कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर मुलींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद, पुढील तपास सुरु

पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची आरास





आज श्रावण शुद्ध अर्थात पुत्रदा एकादशी निमित्त पुणे येथील भक्ताने विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे . पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी हि फुल सजावटीची सेवा दिली आहे . यासाठी शेवंती , झेंडू, अष्टर, अँथोरियम, कार्नेशन, गुलाब, जिप्सोफेलिया, मोगरा आणि तुळस यांचा वापर करीत पाना फुलांची आकर्षक रंगसंगती साधली आहे. श्रावण महिन्यातील एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते. सध्या कोरोनाच्या संकटामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिरातील परंपरा मात्र अखंडित सुरु आहेत. आज सोळखांबी, चौखांबी, विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही फुलांची सजावट केली आहे. 


 

 



 


भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स, सूत्रांची माहिती

भोसरी  एमआयडीसी येथील जमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई अटकेत आहेत. याच  प्रकरणी मंदाताई खडसे यांना ईडीने उद्या हजर होण्याची नोटीस बजावली असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मागील काळात ही त्यांना नोटीस मिळाली असताना त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून पुढची तारीख मागून घेतली आहे. त्यानंतर पुन्हा ईडीने त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्याचं समन्स बजावले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या हजर होणार का? याकडेच आता लक्ष आहे. भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंब अडचणीत आले असतानाच गेल्या आठवड्यात त्यांच्याशीच संबंधीत असणार्‍या मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मिळवण्यासाठी ईडीने जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे. या बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात यामुळे खळबळ उडालेली आहे. यातच आता मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावल्याने यात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंदाताई खडसे या सध्या जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. 

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा मालेगाव दौरा

एकीकडे केंद्र सरकार कोरोना नियमांची कडक अमंलबजावणी करीत असतांना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुरु केलेल्या जन आर्शिवाद यात्रेच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा सर्वांना विसर पडल्याचं पाहायला मिळालं. राज्यात कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमधे झालेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टसिंग पुरता फज्जा उडाला होता. कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती. तर सभेच्या ठिकाणी आलेल्या अनेकांनी मास्क लावलेले नव्हते, जनतेच्या आर्शिवादाने केंद्रात देशसेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून त्याच जनतेचे आर्शिवाद घेण्यासाठी ही जन आर्शिवाद यात्रा असून, जनतेच्या समस्या समजावून घेत त्या सोडविण्यासाठी ही जन आर्शिवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वांगीण विकासाचे काम सुरु असून सर्व घटकांचा विचार करून केंद्रातील सरकार काम करतेय. यावेळी भारती पवार यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. केंद्रीय राज्यमंत्री नियुक्ती झाल्याबद्दल सटाणा परिसरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले जेसीबीने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली तर क्रेनच्या साहाय्याने जम्बो हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला .

एका महिन्यानं देशात डिझेलच्या दरांत घट, पेट्रोलचे दर मात्र स्थिर

इंधनाचे दर बुधवारी पुन्हा एकदा स्थिर असल्यामुळे पेट्रोलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. डिझेलच्या किमतींमध्ये मात्र घट झाल्याचं पाहायला मिळालं. आज सलग 32 व्या दिवशी पेट्रोलच्या किमती स्थिर आहेत. तर डिझेलच्या किमतींमध्ये 20 पैशांची घट झाली आहे. 16 जुलैपासून डिझेलच्या किमती स्थिर होत्या, त्यात कोणताही बदल झाला नव्हता. तर पेट्रोलच्या किमतीत 17 जुलै रोजी वाढ करण्यात आली होती. आज डिझेलच्या किमतींमध्ये घट करण्यात आल्यानंतर डिझेलची किंमत आज दिल्लीत 89.67 रुपये लिटर इतकी करण्यात आली आहे. 

राज्यपाल महोदय,आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा कितव्या महिन्यात हलणार? : सामना

सरकारने 12 नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला आहे. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कधी हलणार हे राजभवनातील सुईणीने स्पष्ट करावं, अशा शब्दात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. 'राज्यपाल महोदय, आठवा महिना लागला!' या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेख असून यात राज्यपालांसह भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. लेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल चेष्टेचा विषय झाले आहेत. पदाचे इतचे अवमूल्यन व घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करुन ठेवली आहे. राजभवनातील घडामोडींचे आता जनतेलाही काही वाटेनासे झालेय. राज्यपालांच्या अध:पतनास जितके ते स्वत: जबाबदार आहेत तितकाच त्यांचा पितृपक्ष भाजप जबाबदार आहे. 12 आमदारांच्या नेमणुका केवळ राजकीय कारणांनी रखडवून ठेवल्या आहेत हे राजभवनातील शेंबडे पोरही सांगेल, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी मधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीवरून ते पुण्यात आले आणि त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. चार दिवसांपूर्वी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील घरात काम करणारा एक व्यक्ती ही पॉझिटिव्ह आढळला आहे.

कोरोनाच्या काळात जे लोक मरण पावले याला सर्वस्वी जबाबदार भाजप : नाना पटोले

"जसं जालियानवाला बाग मधील हत्याकांड घडलं होतं त्याच पद्धतीनं या कोरोनाच्या काळात जे लोक मरण पावले याला सर्वस्वी जबाबदार भाजप आहे. अशा कुटुंबाची पंतप्रधानांनी जाहिर माफी मागायला पाहिजे, हे भारतातील कोरोनाच्या काळात भाजपनं घडविलेलं हत्याकांड आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नांना पटोले यानी खामगाव येथे दिली आहे. ते खामगाव येथे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या विजय संकल्प कार्यक्रमात आले असता त्यावेळी बोलत होते.


तसेच "अफगाणिस्थानात जे घडत आहे ते धार्मिकेतच्या नावावर घडलं आहे. तालिबानींने ते ताब्यात घेतलं आहे. अफगाणिस्थानातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहे. अशा अफगाणी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वस्वी मदत करेल.", असेही आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिलं. 

पार्श्वभूमी

पुनर्विकासानंतर तळीये गाव राज्यातील आदर्श गाव; 13 हेक्टर वरती तब्बल 261 घरांचा पुनर्विकास होणार


रायगड जिल्ह्यातील तळीये गावाचा 13 हेक्टर वरती म्हाडा पुनर्विकास करणार आहे. फक्त तळीये गावाचं नाही तर सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडा करणार आहे. याआधी फक्त 63 घरांची म्हाडा पुनर्बांधणी करणार होती. या संदर्भात काल (मंगळवारी) मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला रायगड जिल्ह्यच्या पालकमंत्री अदिती तटकरे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या. या गावाचा पुनर्विकास करताना राज्यातील एक आदर्श गाव म्हणून याकडे पाहिलं जाईल असं जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाही बोलताना म्हटलं आहे.


तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटल ही बांधल जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. येत्या आठवड्याभरात रायगडचे जिल्हाधिकारी आणि म्हाडाचे अधिकारी तळीये गावाला भेट देतील आणि तेथील जागेचा मार्ग मोकळा केला जाईल. जागा हस्तांतरित झाल्यानंतर युद्धपातळीवर या घरांच्या पुनर्विकासाला गती दिली जाईल. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरूपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात तळीये गाव वसलेल असेल असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे. 


ज्यात काल 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद


राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. काल 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.87टक्के आहे. 


राज्यात काल 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0),  धुळे (5), परभणी (41), हिंगोली (74),   नांदेड (49), अमरावती (90), अकोला (30), वाशिम (5),  बुलढाणा (45), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (2), चंद्रपूर (94)  गडचिरोली (29) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.