Rakesh Tikait : आंदोलन स्थगितीनंतर राकेश टिकैत करणार महाराष्ट्र दौरा, म्हणाले...
Rakesh Tikait : दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
Rakesh Tikait in Maharashtra : वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर असलेले शेतकरी आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर शेतकरी पुन्हा आपल्या राज्यात गेले आहेत. तर, दुसरीकडे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. टिकैत 19 डिसेंबर रोजी वर्धा येथे येणार आहेत. तर, त्याआधी 17 डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मागणीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर शेतकरी आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतरही संयुक्त किसान मोर्चा हा शेतकरी संघटनांचा मंच कायम राहणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता शेतकरी संघटनांकडून पुढील रणनीति आखली जात आहे. तर, शेतकरी संघटनांकडून आता स्थानिक मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
राकेश टिकैत हे 19 डिसेंबर रोजी वर्धेत येणार आहेत. विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या होत्या. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांना इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. अशा स्थितीत राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राकेश टिकैत यांनी म्हटले की, देशातील ज्या ठिकाणांहून बैठकीसाठी बोलावणे येईल, त्या ठिकाणी मी उपस्थित राहणार आहे. टिकैत यांनी शेतकरी आंदोलना दरम्यान दोन वेळेस महाराष्ट्र दौरा केला होता. एकदा त्यांनी पालघर येथील शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांची भेट घेत त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. तर, दुसऱ्यांदा त्यांनी आझाद मैदानात झालेल्या शेतकरी-कामगार महापंचायतीत उपस्थित राहत मार्गदर्शन केले होते.
राज्यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला नैसर्गिक संकट तर, दुसऱ्या बाजूला शेतमालाचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. त्याशिवाय, पीक विमा, वीज पुरवठा आदींसह इतरही अनेक मुद्दे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवू, 'दिग्विजय बागल तुमची मस्ती जिरवायला येतोय', रविकांत तुपकरांचा इशारा
- भाजप आमदाराचा आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha