ठाणे :  भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रक्षोभक वक्तव्य करण्यामुळे चर्चेत असणारे भाजपचे आमदार टी राजा सिंह हे उपस्थित होते. या धर्मसभेत बोलताना त्यांनी वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत असे आवाहनही टी राजा सिंह यांनी केले. तसेच या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असेही टी राजा सिंह म्हणाले.


धर्मसभेत वेगवेगळे ठराव मंजूर


या धर्मसभेत व्यासपीठावर बालयोगी सदानंद महाराज, महंत शिर चिदानंद सरस्वती, स्वामी गोविंदगिरी, महंत श्री फुलनाथ बाबा, आयोजक श्री शिवरूपानंद स्वामी उपस्थित होते. तर सभेस तालुक्यातून हजारोंच्या संख्येने हिंदू धर्मीय उपस्थित होते. या हिंदू धर्मसभेत धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा, वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा, लव्ह जिहादविरोधी कायदा मंजूर करावा, गोहत्या बंदी कठोर करून त्याची अंमलबजावणी व्हावी, बेकायदेशीर भूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे असे विविध ठराव पारित करण्यात आले.  


किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावे


या सभेत बोलताना "महाराष्ट्रात मठ, मंदीर सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 370 किल्ले जिंकले, पण दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बनविण्यात आले आहेत. राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे त्यांनी किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावे," असे आवाहन टी राजा सिंह यांनी केले. 


लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही?


विशेष म्हणजे "नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा 400 पेक्षा अधिक जागांवर विजय झाला असता तर भारत देश हिंदुराष्ट्र झाले असते," असे विधानही टी राजा सिंह यांनी केले. "हिंदू-मुस्लीम बंधुत्त्वाचा नारा देत मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही?" असा सवालही टी राज सिंह यांनी केला. तसेच हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही, असंही टी राजा सिंह म्हणाले. 


जो हिंदू हित की बात करेगा...


"महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचे भय आहे. त्यांच्या मागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे. मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जात आहे. हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे," अशी मागणी टी राज सिंह यांनी केली. तसेच जो हिंदू हित की बात करेगा वह महाराष्ट्र पर राज कारेगा अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.


हेही वाचा :


मागे वाघ, पुढे नारायण राणे, 'बाप बाप होता है', म्हणत उदय सामंत यांच्या गावात भाजपचा बॅनर!


निलेश लंके मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, रुग्णालयात जाऊन केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे