नागपूर: लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठीच्या आंदोलनाची गरजच नव्हती, अशी टीका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केली आहे. ओबीसींच्या आरक्षणावर (OBC Reservation) संवैधानिक गदा आली आहे अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय करताना राज्य सरकारने लिहून दिले होते, की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही देणार नाही, त्या आश्वासनावर सरकार आजही ठाम आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे कोणत्या उद्दिष्टाने व कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे, हेच स्पष्ट नाही, अशी टिप्पणी बबनराव  तायवाडे यांनी केली. त्यांनी रविवारी नागपूरमध्ये एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाविषयी नापसंती व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्राणांतिक उपोषणाविषयी एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 


ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्याची भाषा लक्ष्मण हाके करत असले, तरी ओबीसींचे आरक्षण कसे धोक्यात आले आहे, हे तरी कळले पाहिजे, असा सवाल तायवाडे यांनी उपस्थित केला. ओबीसींच्या नावाने केलेल्या या आंदोलनामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल तर होणार नाही ना? आणि त्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी ही लक्ष्मण हाके यांनी घेण्याची गरज असल्याचे तायवाडे म्हणाले. 


मनोज जरांगेंच्या आंदोलनाविषयी बबनराव तायवाडे म्हणाले...


यावेळी डॉ. बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाविषयी भाष्य केले. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आता एक महिन्यांचा वेळ दिला आहे.. मात्र, आंदोलन सुरू करण्यापूर्वीच जरांगे यांनी एक महिन्यांचा वेळ दिला असता, तर त्यांनाही आंदोलन करण्याची गरज नव्हती. कारण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारला वेळ द्यावाच लागते. एखादी मागणी संविधानाच्या चौकटीत, न्यायालयाच्या नियमात बसत नसेल, तर सरकार कोणत्याही पक्षाचा असो ती मागणी पूर्ण करू शकत नाही, असे सूचक वक्तव्य तायवाडे यांनी केले. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके दोघांनीही संयम ठेवण्याची गरज आहे. आपल्या कृतीमुळे दोन्ही समाजात संघर्षाची स्थिती निर्माण होणार नाही,  याची काळजी त्यांनी घ्यावी असा सल्लाही डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला. 


आणखी वाचा


सगेसोयरेचा जीआर काढलात, ओबीसी आरक्षणाला विरोध केलात तर विधानसभा निवडणुकीत पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा