मुंबई : भाजपकडून (BJP) मुंबईकरांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येणरा आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन अयोध्या (Mission Ayodhya) सुरु करण्यात आलंय. त्याचसाठी उद्या रात्री 9 वाजता मुंबईतून पहिली विशेष रेल्वे रवाना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. 


राम जन्मभूमीच्या आंदोलनांनी राजकारणात भाजपच्या प्रगतीचा आलेख हा कायमच चढता ठेवला. त्याच राम जन्मभूमीतील आंदोलनाची पूर्तता होऊन रामलल्ला आपल्या भव्य राम मंदिरात विराजमान झाले. त्याचपार्श्वभूमीवर आता भाजपकडून राम भक्तांसाठी मेगाप्लॅन तयार करण्यात आलाय. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनानंतरही अनेक महिने तसेच सकारात्मक राजकीय वातावरण कायम ठेवण्याचं भाजपचं नियोजन आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचा हा मेगाप्लॅन तयार करण्यात आलाय. 


भाजपचं "मिशन अयोध्या" कसं अमलात येईल?


आमदाराने त्यांच्या मतदारसंघातून 5 हजार तर खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातून 20 हजार राम भक्तांना अयोध्येत न्यायचे आहे. आमदार आणि खासदार यांच्या मदतीने जाणारे राम भक्त वेगवेगळे असणार आहे. म्हणजेच एका लोकसभा मतदारसंघातून 40 ते 50 हजार लोकं राम लल्लाचे दर्शन घेतील असे नियोजन करण्यात आलंय. त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्यात. एकदा यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पुढील अनेक महिन्यात पार पाडली जाईल. त्यासाठी खास रेल्वे गाड्या बुक केल्या जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलीये. 


अयोध्येत राम भक्तांच्या व्यवस्थेसाठीही प्रयत्न


राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पुढील काही महिने प्रत्येक मतदारसंघातून राम भक्तांची अयोध्या वारी सुरु राहील, असं सांगण्यात आलं होतं. अयोध्येत राम भक्तांसाठी निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यासाठी पक्षाच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल आणि काही महिने त्यांचा तेथेच मुक्काम असेल. अयोध्येत राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह अनेक भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते.अनेक दशके राम जन्मभूमीचे आंदोलन चालून न्यायालयीन लढ्यानंतर तिथे आता भव्य मंदिर साकारण्यात आलं आहे. 


ही बातमी वाचा :


Wardha : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार, वर्धा लोकसभेकरता राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुखांना कामाला लागण्याचे आदेश?