परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर निधी वाटपावरून परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी न्यायालयात अडकल्यावरून भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी शिवसेना खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे (Vijay Bhamble) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका गावातील शाळेची झालेली दुरवस्थाबाबत बोलतांना बोर्डीकर यांनी ही टीका केली आहे.
परभणी जिल्हा नियोजन समितीचा 2023-24 या वर्षाचा जवळपास तब्बल 300 कोटी रुपयांचा निधी सध्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे थांबला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील विकास कामे खुंटली आहेत. दरम्यान, भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर जाऊन शाळेच्या दुरावस्थेला विद्यमान खासदार संजय जाधव व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हेच दोषी असल्याचा आरोप केला आहे. निधीवर न्यायालयाने स्थगिती आणल्याने विकास काम होत नसून, जाणीवपूर्वक निधी न्यायालयात अडकवण्यात आल्याचा आरोप जाधव आणि भांबळे यांच्यावर बोर्डीकर यांनी केला.
बोर्डीकर यांची टीका...
याबाबत बोलतांना बोर्डीकर म्हणाले की, “शिवसेना उद्धव गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे या दोघांनी जाणून-बुजून जिल्हा नियोजनच्या निधीच्या खर्चाला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. सरकारने परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी दिला. त्यामुळेच द्वेषच्या भावनेतून त्यांनी हे कृत्य केल्याचेही आमदार बोर्डीकर म्हणाल्या. यावेळी आमदार बोर्डीकरांनी खासदार संजय जाधव आणि माजी आमदार भांबळे यांना उपरोधात्मक टोला देखील लगावला. तुमच्या या कार्यामुळे परभणीकरांना नाहक त्रास होत आहे. आज जिल्ह्यामध्ये 300 कोटीची विकास कामे थांबली आहेत. त्यामुळेच मुलांना आपल्या शाळेतील वर्गावर छप्पर मिळत नाही. तर, ग्रामीण भागात रस्ते होत नाहीत. परभणी शहरांमध्ये देखील रस्त्याचे बकाल अवस्था आहे. पण या स्थगितीमुळे 28 कोटी रुपयांचे रस्ते रखडल्याचेही आमदार बोर्डीकर म्हणाल्या आहेत.
आरोप-प्रत्यारोप....
महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांना निधी दिला जात नसल्याचा आरोप सतत विरोधकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीचा 2023-24 या वर्षाचा जवळपास 300 कोटी रुपयांच्या निधीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. त्यामुळे या निधीवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या निधीवरून आरोप-प्रत्यारोप होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: महादेव जानकर परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार; महायुतीची अडचण वाढणार?