वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातून (Wardha Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरावतीचे हर्षवर्धन देशमुख (Harshvardhan Deshmukh) यांचं नाव पुढे आल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शरद पवार (Sharad Pawar)  यांच्याकडून कामाला लागण्याचे आदेश दिल्याने काँग्रेसच्या (Congress)  गोटात स्मशान शांतता दिसून येतेय. 


विशेष म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्लामध्ये गेल्या दोन निवडणुकीपासून आता भाजपाचा खासदार आहे. अशात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जागा जाणार असे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही महायुतीमधून  वर्धा लोकसभेची जागा मागितली जात आहे. 


देशमुखांना लोकसभेची तयारी करण्याचे आदेश


वर्धा जिल्हा म्हटले की लोकसभेकरता काँग्रेस उमदेवार डोळ्यापुढे येते. पण मागील दोन निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाल्याने यावेळी काँग्रेसच्या दावेदारीवर घटक पक्षांकडून प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. काँग्रेसकडून लोकसभेकरिता उमेदवार कोण? असा प्रश्न कायम असताना महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांना मिळणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. शरद पवार यांनी वर्धा लोकसभेची तयारी करण्यास देशमुख यांना सांगितल आहे. पवारांच्या आदेशानंतर हर्षवर्धन देशमुखांनी स्थानिक नेत्यांना त्याची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. 


काँग्रेसकडे उमेदवार नाही


दोन वेळच्या पराभवानंतर इंडिया आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढण्याकरता मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामध्ये जागा वाटपाच्या अनुषंगाने देखील चर्चा होत आहेत. सध्या कुठल्याही जागांवर अंतिम निर्णय झालेले नसले तरी उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने कायम दावेदारी केली आहे. 


गेल्या काही दिवसात माजी मंत्री सुनील केदार, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शिरीष गोडे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, आमदार रणजित कांबळे ही नावे काँग्रेसकडून चर्चेत होती. पण सुनील केदार तुरुंगात गेल्याने केदार यांचे नाव मागे पडले आहे. काँग्रेसकडून दावेदारी केली जात असताना मोठे नाव मात्र अजून पुढे आले नाही आणि स्वतःहून कोणता नेता येथे निवडणूक लढण्यास इच्छुक दिसून येत नाही.


एकीकडे काँग्रेसकडून दावेदारी केली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील हर्षवर्धन देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात वरुड मोर्शी मतदारसंघ येतो.वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हर्षवर्धन देशमुख यांना मिळेल, अशी माहिती पक्षांतर्गत सूत्रांकडून मिळते आहे. मागील तीन दिवसांपासून हर्षवर्धन देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 


काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील देशमुख यांच्या नावाची उमेदवारीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत हर्षवर्धन देशमुख यांचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय गोटात मात्र चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन देशमुख यांना वर्धा लोकसभेकरीता कामाला लागण्यास सांगितल्याचे कळते. थेट शरद पवार यांनीच सांगितल्यानंतर देशमुख यांनी वर्धा जिल्ह्यातील नेत्यांना ही माहिती दिली. मात्र याबाबत पदाधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येते. 


काँग्रेस हा आमचा परंपरागत मतदारसंघ असल्याने आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा दावा काँग्रेसकडून केला जात असल्याने उमेदवारी वरून कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.


अजित पवार गटाकडूनही तयारी सुरू 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सुटली तर महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट देखील माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी वर्धा लोकसभेची जागा मागते आहे. त्यामुळे पुढे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना देखील लढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.