Congress BJP Protest Mumbai : मुंबईत दादर स्थानकाजवळ काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विरोध केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकांची हेरगिरी केली जात असून फोन टॅपिंग सुरू आहे. पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याच देशात नागरीक सुरक्षित नसल्याचे म्हटले. मुंबई युथ काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले होते. आमदार झिशान सिद्दीकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलन करण्यासाठी काँग्रेस आंदोलक दादर स्थानकाबाहेर जमले होते. या ठिकाणांहून काँग्रेस कार्यकर्ते दादरमधील भाजप कार्यालयावर जाणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
भाजपचेही आंदोलन
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला भाजपनेदेखील प्रत्युत्तर दिले. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी वसंत स्मृती कार्यालयातून बाहेर येत दादर स्टेशनकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी अटकाव केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांना धक्काबुक्की
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांना अटकाव करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, या दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की करण्यात झाली. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटकाव करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली.