Maharshtra Politics : आधी सत्यजित तांबे म्हणाले देवेंद्र माझे मोठे बंधू, आता राष्ट्रवादीचा बडा नेता म्हणतो देवेंद्र माझा लहान भाऊ
Devendra Fadnavis : गोंदिया जिल्हा परिषदेत एकत्रित सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस.. तर भंडारा जिल्हा परिषदेत एकत्रित विरोधी बाकावर बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस...
Devendra Fadnavis : नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपले मोठे बंधू असल्याचं म्हटलं होतं. आता गोंदियातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस माझे लहान भाऊ आहेत, असं वक्तव्य केलेय. प्रफुल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात काही नवीन राजकीय समीकरण शिजतेय का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेत एकत्रित सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस.. तर भंडारा जिल्हा परिषदेत एकत्रित विरोधी बाकावर बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस... सध्या या दोन्ही पक्षात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासंदर्भात काहीतरी वेगळं शिजतंय का??? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यानंतर सुरु झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांनी आज गोंदियात एका शैक्षणिक कार्यक्रमात फक्त मंच शेयर केला नाही... तर भविष्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने अनेक सूचक वक्तव्यही केली आहे. गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्यादरम्यान खास राजकीय केमिस्ट्री दिसून आली..
देवेंद्र फडणवीस हे माझे लहान भाऊ आहेत, मित्र आहेत.. शुभचिंतक आहेत.. ते दूरदर्शी कर्तबगार आणि डायनामिक उपमुख्यमंत्री आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले. जेव्हा मी इथे आहे आणि प्रफुल्ल पटेलही इथे आहेत.. तर चर्चा तर होणारच आणि बात निकली है तो दूर तक जायेगी, असं भाषणादरम्यान देवंद्र फडणवीस म्हणाले.
नेमकं काय शिजतेय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुत्सद्दी नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने, दोन्ही सर्वोच्च नेत्यांची ही वक्तव्यं उगीचच नाहीत... तर त्या मागे विशेष काय आहे... आणि भविष्यातील राजकारणाची नांदीही आहे, अशी राजकीय चर्चा सुरु आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती सत्तेत आहे.. तर भंडारा जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष काँग्रेस विरोधात एकत्रित विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काँग्रेस विरोधात एक खास केमिस्ट्री आहे. आज प्रफुल्ल पटेल यांचे वडील कै. मनोहर भाई पटेल यांच्या 117 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही ही राजकीय केमिस्ट्री दिसून आली. जरी हे कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक बहाल करण्याचे असले तरी दोन्ही नेत्यांनी इशाऱ्या इशाऱ्यामध्येच का होईना सूचक वक्तव्य केले...
फडणवीस जिथेही जातात काहीतरी घेऊन जातात -
दोघांमधील या खास जुगलबंदीला काँग्रेस नेते आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी अचूक हेरले. देवेंद्र फडणवीस गोंदियात आले आहेत, तर ते निश्चितच काही तरी घ्यायला आले आहेत, असे विजय दर्डा म्हणाले. फडणवीस जिथेही जातात काहीतरी घेऊन जातात. मागील काही वर्षात राजकारणात काय काय झाले आहे.. हे सर्वांना माहिती आहे.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कुठेही असेच जात नाही आणि असेच येत नाही असे विजय दर्डा म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारण 2019 पासून कमालीचा अस्थिर आहे. मग फडणवीस आणि अजित पवार यांचं पहाटेचं सरकार असो... किंवा शिवसेनेतील ऐतिहासिक बंडाळी... महाराष्ट्रातील राजकारणात सर्वकाही शक्य आहे, असेच म्हणावे लागेल. आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी फडणवीस आणि भाजपचा इनकमिंगवर जोर आहे, हेही लपलेलं नाही... गोंदियातील आजचा कार्यक्रम आणि त्यातील वक्तव्यं त्याकडेच टाकलेलं एक पाऊल आहे का?? याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.