Nashik Birhad Morcha : बिऱ्हाड मोर्चाचा नाशिक-मुंबई महामार्गावर दोन तास रास्ता रोको, आंदोलकांचा आत्मदहनाचा इशारा
Nashik Birhad Morcha : नाशिक ते मुंबई मंत्रालय (Nashik To Mumbai) असा पायी बिऱ्हाड मोर्चा रोजंदारी शिक्षकांकडून काढण्यात आला आहे.
Nashik Birhad Morcha : विविध मागण्यासाठी पाच दिवसापूंर्वी नाशिक (Nashik) येथून निघालेला बिर्हाड मोर्चा (Birhad Morcha) आज शहापूरवरुन भिवंडीत दाखल झाला असून मोर्चेकऱ्यांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर तब्बल दोन तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी पञ हातात मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन (Protest) चालूच ठेवण्याची भूमिका या मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.
नाशिक ते मुंबई मंत्रालय (Nashik To Mumbai) असा पायी बिऱ्हाड मोर्चा रोजंदारी शिक्षकांकडून काढण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करणे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. हजारोच्या संख्येने रोजंदारी शिक्षकांसह महिला लहान मुले मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी शिक्षकांना कायमस्वरूपी वेतन देण्यात यावे, यासह कंत्राटी शिक्षक भरती विरोधात सर्व शिक्षक एकवटलेले असून रोजंदारी शिक्षक मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येत निघालेले आहे. हे शिक्षक आंदोलक आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, मानधनात वाढ व्हावी या मागण्यांना प्राधान्य देऊन पोलीस बंदोबस्तासह मुंबईकडे निघालेले आहेत.
दरम्यान 13 जून रोजी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानातून हा माेर्चा निघाला होता. गुरुवारी माेर्चेकऱ्यांनी ठाणे जिल्ह्यात प्रवेश केल्यावर त्यांनी मुंबई- नाशिक महामार्गावर (mumbai nashik highway) तीन ठिकाणी महामार्गवरील वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान आज देखील नाशिक मुंबई महामार्गावरील खडवली फाटा परिसरात मागील दोन तासापासून मोर्चेकरी रास्ता रोको केला. त्यानंतर मोर्चेकरी मुंबईकडे रवाना झाले असून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. मोर्चेकरी रास्ता रोको करत असल्याने महामार्गावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस विभागाचे नाकी नऊ झाले आहेत .
या मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा
दि. 25 में, 2023 रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करण्यात यावे, 10 वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचा जागेवर एकही कर्मचा-यास बाह्यस्त्रोताव्दारे घेण्यात येऊ नये , मागील शैक्षणिक वर्ष सन-2022-23 मध्ये कार्यरत असलेल्या सर्व रोजदारी वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांना चालू शैक्षणिक वर्ष सन-2023-24 मध्ये रोजंदारीचे आदेश प्रदान करण्यात यावे, 10 वर्षांखालील कार्यरत सर्व रोजंदारी वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण हाईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे. तसेच त्यांना सेवेतून कमी करण्यात येऊ नये, तासिकारोजंदारी वर्ग-३ मानधन व वर्ग-४ मजुरी वाढ करावी, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी घेतली असून ते मंत्रालयाकडे कुच करत आहेत.