रत्नागिरी : 'आमरस' प्रत्येकाच्या आवडीचा असा पदार्थ. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करत आंबावडी आणि आमरस तयार केला जातो. त्यामुळे हापूस आंब्याच्या निर्यातीसह मोठ्या प्रमाणावर कोकणात कॅनिंग उद्योग देखील आपल्याला पाहायाला मिळतात. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात शेकडो छोटे - मोठे युनिट्स उभारलेले असून यातून लाखो टन आंब्यावर प्रक्रिया करत आमरस तयार केला जातो. त्यानंतर वर्षभर हा आमरस राज्य किंवा देशच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवला जातो. पण, यंदा मात्र या उद्योगावर 'संक्रांत' आल्याचं दिसून येत आहे. शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाली असून हजारो कुटुंबं सध्या आर्थिक विवंचनेत असल्याचं दिसून येत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करत आमरस तयार केला जातो. त्यानंतर वर्षभर हाच आमरस सर्वत्र पोहोचवला जातो. पण, यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. बऱ्याच प्रक्रिया उद्योगांमध्ये आमरस तयारच केला नाही. शिवाय ज्यांनी तयार केलाय त्यांच्या मालाला बाजारपेठेत मागणी नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठं आर्थिक संकट या उद्योगावर घोंगावत आहे.
काय आहे नेमकी स्थिती? उद्योजकांचं म्हणणं काय?
यंदा कोरोनामुळे नेमकी काय स्थिती आहे? याबाबत जाणून घेण्यासाठी 'एबीपी माझा'नं रत्नागिरीपासून जवळच असलेल्या पावस येथील उद्योजक आनंद देसाई यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना ''कोरोनामुळे नक्कीच या व्यवसायावर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरवर्षी एप्रिल ते जून या कालवधीत लाखो टन आंब्यापासून आमरस तयार केला जात असे. त्यानंतर हाच माल वर्षभर जगाच्या बाजारपेठेसह देशातील इतर ठिकाणी देखील पाठवला जात आहे. पण, यंदा सारं ठप्प आहे. टाळेबंदीमुळे जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्यानं इतर राज्यांतून किंवा जिल्ह्यांमधून देखील मजूर आणणं शक्य झालं नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. शिवाय, उत्पादन केल्यानंतर देखील तो पाठवणार कुठं असा प्रश्नच होता आणि आहे. हॉटेल, रेस्टारंट बंद असल्यानं मागणी नाही. मिठाईची दुकानं देखील बंद त्यामुळे त्या ठिकाणाहून देखील मागणी नाही. तर, सण साजरे करताना देखील लोक बाहेर पडली नाहीत. परिणामी दुकानांमध्ये होणारी मागणी देखील घटली'' अशा माहिती त्यांनी दिली.
तर, आनंद देसाई रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रक्रिया उद्योग चालवतात. केंद्र सरकारनं केलेल्या आर्थिक साहाय्यातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. दरम्यान, या ठिकाणी किती आमरस तयार झाला? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्याबाबत माहिती देताना ''यंदा या कारखान्याचं दुसरं वर्ष. एप्रिल ते जून या कालावधीत साधारण 50 ते 60 कोटींची उलाढाल या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. पण, यंदा 100 ग्रॅम देखील आमरस तयार झाला नाही. मागणी नाही, कर्मचाऱ्यांची वाणवा, बाजाराची स्थिती काय आहे हे तुम्ही सर्व जाणता'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पाहा व्हिडीओ : रत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यवसायिकांना अच्छे दिन; 'या' देशात होते इतक्या कोटींची निर्यात
'इतर युनिट्सची काय स्थिती?'
रत्नागिरी जिल्ह्यातील इतर छोट्या - मोठ्या युनिट्सची देखील काही वेगळी परिस्थिती नाही. काहींनी जरी आमरस तयार केला असला तरी त्याला मागणी आहे कुठं? शिवाय, कोकणातील रानमेव्यावर प्रक्रिया करत इतर देखील पदार्थ तयार केले जातात. पण, त्यांची अवस्था काही वेगळी नसल्याची माहिती देसाई यांनी दिली.
''येणारा सिझन फायद्याचा ठरणार? सरकारकडून काय अपेक्षा?''
यावेळी आम्ही येणारा सिझन कसा असेल? असा सवाल देसाई यांना केला. त्यावेळी त्यांनी ''हा उद्योग दोन महिन्याचा वाटत असला तरी त्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा देखील जास्त काळ मेहनत असते, आंब्याच्या बागांमध्ये जवळपास वर्षभर मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर त्याचं 'फळ' मिळतं. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या या उद्योगाकडे सरकारनं लक्ष देत आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केलीय.
महत्त्वाच्या बातम्या :
रत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यावसायिकांना अच्छे दिन; या देशात होते इतक्या कोटींची निर्यात