रत्नागिरी : मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. विस्तीर्ण असा समुद्र किनाऱ्या लाभलेल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पारंपरिक आणि आता पर्सेसिन बोटींच्या साहाय्यानं मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 7500 कुटुंब ही मासेमारी या व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत. यातून दररोज कोटींची उलाढाल देखील होते. पण, मार्चपासून लॉकडाऊननची घोषणा झाली आणि यावर अवलंबून असणारे हजारो हात बेरोजगार झाले. सारी उलाढाल ठप्प झाली. त्यानंतर ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू झाली खरी, पण मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय खलाशांची वाणवा देखील आहेच.


आता मात्र चित्र काहीसं बदलत असल्याचं दिसून येत आहे. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातून सध्या दररोज 15 ते 20 टन म्हणजेच जवळपास 1 कोटींची मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडमधील जेएनपीटी या ठिकाणी हे मासे पाठवले जातात. त्यानंतर जेएनपीटीवरून युरोपीयन देशांकरता निर्यात करतात. शिवाय, मुंबई करता देखील विशिष्ठ प्रकारची मासे रवाना केले जातात.  त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या मासे व्यवसायाला आता सुगीचे दिवस येत आहेत. मध्यंतरीच्या काळात वातावरण बदलामुळे देखील मासेमारी व्यवसायाला फटका बसला होता.

कोणत्या प्रकारची मच्छि होतेय निर्यात? दर किती मिळतोय?

आजघडीला रत्नागिरी जिल्ह्यातून पापलेट, सफेद कोळंबी (white prawns), खवला मासा, पातुर्डी निर्यात केली जात आहे. सध्या पापलेटला मिळणारा दर हा 450 ते 1000 रूपये प्रति किलो, सफेद कोळंबीला जवळपास 500 ते 500 रूपये प्रति किलो दर मिळत आहे. शिवाय, मत्यशेतीअंतर्गत केलेली कोळंबी देखील सध्या निर्यात होत आहे. परिणामी आता मासेमारीचं अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे.

खलाशांची कमी

सध्या मिळणारे मासे आणि त्यांची होणारी निर्यात ही समाधानाची बाब नक्कीच आहे. पण, खलाशांची वाणवा हा सध्या मोठा प्रश्न पर्सेसिन मच्छिमारांना भेडसावत आहेत. राज्यातील खलाशी परत येत असले तरी नेपाळ किंवा इतर राज्यातील खलाशी अद्याप देखील परत आलेले नाहीत. परिणामी अनेक पर्सेसिन नौका या किनारी उभ्या असल्याचं चित्र आहे. खलाशी मिळाल्यास मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेल्या उलाढालीला आणखी वेग येऊ शकतो अशी शक्यता देखील जाणकार व्यक्त करतात.