सोलापूर : उजणी धरणातून हिपरग्गा तलाव्यात पाणी सोडण्यासाठी 1999 साली मंजूरी देण्यात आलेली योजना अखेर 21 वर्षांनी कार्यान्वित झाली आहे. सोलापूरला उजनीच्या डाव्या कालव्यातून पाणी आणण्याची योजना 21 वर्षांपूर्वी आखली गेली होती. गेली 21 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता. राजकीय इच्छाशक्ती आणि निधी दोन्हींच्या अभावामुळे हा बंद होता. मात्र अखेर 21 वर्षांनंतर ही योजनेची चाचणी यशस्वीपणे पुर्ण झालीय. येत्या आठ ते दहा दिवसात ही योजना पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता चेतन राठोड यांनी दिली.


पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी उजनी धरण देखील आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला तरी सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर इत्यादी भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे उजनीचे पाणी हिप्परगा तलावात सोडण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणी आणि निधी अभावी गेली अनेक वर्ष ही योजना रखडलेली होती. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी मदत होणार आहे.


उजनीतून विसर्ग करण्यात आलेले पाणी कारंबा शाखा कालव्यामार्गे हिप्परगा तलावात सोडण्यासाठी भोगाव हद्दीतील हिप्परगा तलावाच्या उजव्या बाजूला पंप हाऊस उभारण्यात आला आहे. पाणी लिफ्ट करण्यासाठी या पंप हाऊसमध्ये 6 मोटर बसवण्यात आल्या आहेत. ज्यांची क्षमता 265 एचपी इतकी आहे. जलसंपदा विभागाने तयार केलेल्या या योजनेतून उजनीचे पाणी हिप्परगा तलावात टाकण्यात येणार आहे. या सहा पंप पैकी दोन पंपची चाचणी यशस्वीपणे पार पडली. येत्या आठ दिवसात उर्वरित चार पंप देखील कार्य़न्वित होणार आहेत.


दरम्यान हिपरग्गा तलावात आलेले पाणी क्षमतेनुसार एकरुख सिंचन योजनेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यासाठी देखील देता येणार आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसात पहिल्या टप्प्यात पाणी बोरामणीपर्यंत पोहोचवता येणं शक्य असल्याची माहिती देखील जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. या योजनेमुळे अवर्षनप्रवन अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 17 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.