Nagpur News : भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची यात्रेत सहभागी होण्यासाठी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गर्दी होत आहे. सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी संयमाने वागावे आणि नागरिकांना अशी धक्काबुक्की करु नये, ते योग्य नसल्याचे कॉंग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले. पोलिसांच्या धक्काबुक्कीमुळे त्यांच्या डोक्याला आणि डोळ्यावर जबर दुखापत झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.


राऊत म्हणाले की, भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे मी सहभागी झालो असताना चारमिनार जवळ खूप गर्दी झाली होती. त्या ठिकाणी राहुल गांधी यांचा ताफा आला, तेव्हा पोलिसांनी अचानकच गर्दी नियंत्रण करण्याच्या नावाखाली धक्काबुक्की सुरू केली. तेलंगाना पोलिसांच्या एसीपीने माझ्या छातीवर जोरात धक्का मारला आणि त्यामुळे मी रस्त्यावर डोळ्याच्या भारावर पडलो. खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. मात्र पोलिसांनी मला उचललं नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी मला उचलले आणि दुचाकीवर बसवून मला रुग्णालयात नेले. मात्र सुमारे 22 मिनिटे रक्तस्त्राव झाल्याचे यावेळी राऊत यांनी सांगितले.


रुग्णालयात पोहोचण्याच्यापूर्वीच मला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (congress president mallikarjun kharge) आणि इतर अनेक नेत्यांचे फोन आले. भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, गर्दी आवरताना पोलिसांनी अशा पद्धतीने सक्ती करू नये, पोलिसांनी संयमाने वागले पाहिजे, जनतेला अशी धक्काबुक्की योग्य नाही, नसल्याचेही यावेळी ते म्हणाले. डोळ्याला इजा झाली आहे, छोटं फ्रॅक्चर ही झाला आहे, अजून आठ दिवस मला बरं होण्यासाठी लागतील. त्यामुळे मी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवेशाच्या वेळेला मी सहभागी होणार नाही, दुसऱ्या टप्प्यात 15 नोव्हेंबर पासून सहभागी होणार असल्याचे यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले.


गुजरातमध्ये कॉंग्रेसच पर्याय


गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र भाजप नेत्यांच्या मनमानीला नागरिक कंटाळले आहे. त्यामुळे गुजरात (Gujarat Assembly Election) मध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वतः पंतप्रधानांनाही प्रचारासाठी उतरावे लागत आहे. गुजरात मधील परिस्थिती काँग्रेससाठी चांगली आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहे, या वरूनच भाजप आणि मोदींच्या मनात भीती असल्याचे दिसून येत आहे, असल्याचेही यावेळी ते म्हणाले.


संबंधित बातमी


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सहा नोव्हेंबरला महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जय्यत तयारी