Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा 6 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून भारत जोडो यात्रेची सुरुवात होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील 28 पदाधिकारी मदतीसाठी नियुक्त केले आहेत. या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल. 


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी आहे. नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यात्रेसाठी 28 पदाधिकारी नियुक्त केले आहेत. सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झालेत. नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत.  देगलूरहून सुरू होणारी भारत जोडो यात्रेसाठी महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरदचंद्र पवार यांच्या सह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात कुठून होणार भारत जोडो ची सुरुवात…


नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा 6 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल होणार.


राहुल गांधींची ही यात्रा दररोज किमान 25 किमीचा पायी टप्पा पार करणार.


राहुल गांधी तब्बल 5 दिवस नांदेड जिल्ह्यात वास्तव्यास असतील.


पहिला दिवस सोमवार  दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी देगलूर बसस्थानकापासून  सकाळी 6:30 वाजता भारत जोडो यात्रा सुरू होणार.


दुसरा दिवस मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी बिलोली तालुक्यातील खतगाव फाटा येथे 3:30 वाजता यात्रा दाखल होणार.


तिसरा दिवस बुधवार 9 नोव्हेंबर बिलोली तालुक्यातील शंकरनगर रामतीर्थ येथे सकाळी 6:30 वाजता यात्रा दाखल होणार आणि संध्याकाळी 3:30 वाजता कुसुम लॉन्स नायगाव येथे येणार.


चौथा दिवस गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी लोहा कंधार तालुक्यातुन लोहा तालुक्यातील कापशी येथे सकाळी 6:30 वाजता यात्रा दाखल होणार व लोहा कंधार तालुका पार करत 6:30 वाजता देगलूर नाका नांदेड येथे येणार.


पाचवा दिवस शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 :30 वाजता भोकर तालुक्यातील दाभड मार्गे निघून अर्धापुर येथे 6:30 वाजता पोहचणार.


ही यात्रा या दिवशी अर्धापुर,हदगाव तालुक्यातील चोरांबा पाटी येथे 3:30 वाजता दुपारी पोहचून ,संध्याकाळी 6 :30 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील पृथ्वीराज हॉटेल येथे पोहचणार.


हिंगोलीतही जोरदार तयारी सुरू -
भारत जोडो यात्रा तेलंगणानंतर महाराष्ट्रात येत आहे त्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे. राहुल गांधी भारत  जोडो यात्रा निमित्त 11 ते 14 नोव्हेंबर हिंगोली जिल्ह्यात राहणार आहेत. राहुल गांधी यांचे चार मुक्काम हिंगोली जिल्ह्यात असणार आहेत. तर 12 आणि 13 नोव्हेंबर ला राहुल गांधी कळमनुरी शहरातील सातव कॉलेज च्या मैदानात मुक्कामी राहणार आहेत. त्या मैदानात आता तयारी सुरू आहे. राहुल गांधी यांना चालता फिरता यावे यासाठी गोलाकार मैदान करण्यात येत आहे. हे मैदान माती टाकून थोडे उंच करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी दोन दिवस राहुल गांधी यांना वर्कआऊट करता यावे, बॅडमिंटन खेळता यावे   त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर थोडं फिरता यावं यासाठी तयारी केली जात आहे. 


परभणीतून रोज ३ हजार कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन 
परभणीत हि भारत जोडो यात्रेसाठीचे नियोजन करण्यात येत आहे. ज्यात 14 दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे, त्यासाठी रोज प्रत्येक नेंत्याच्या तालुक्यातून ३ हजार कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांना घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले. ज्यासाठी काँग्रेसच्या  नेत्या वर्षा गायकवाड तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत दोन बैठका पार पडल्या आहेत.. 


राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची  भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3500 किमीचा प्रवास करणार आहे. कन्याकुमारी ,तामिळनाडू ,
कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश करणार आहे. देगलूरात भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.  अनेक रस्त्यांची डागडुजी, रंगरंगोटीसह अतिक्रमण हटवले जात आहे.  त्यासाठी देगलूर शहरातील शिवाजीनगर विद्यालयादरम्यान मुख्य रस्त्यावर दुभाजकांची मुख रंगरंगोटी करण्यात आलीय. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून करण्यात आली.  महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आल्यानंतर महाराष्ट्र  कोंग्रेस पक्ष पातळीवर यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन, यात्रा सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी  काँग्रेसमय वातावरण तयार करण्यात आलंय.