Bhandara News भंडाराकुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी पहाटे गावालगत असलेल्या जंगलात मोहफूल वेचायला गेलेल्या एका महिलेवर वाघानं (Tiger Attack) हल्ला केलाय. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना  भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील पवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कन्हाळगाव येथील वन विभागाच्या कंपार्टमेंट नंबर 316 मध्ये घडली आहे. सीताबाई श्रावण दडमल (वय 64 वर्ष ) असं या मृतक महिलेचं नाव आहे. मात्र या घटनेमुळे आता सर्वत्र एकच खळबळ उडाली असून वाघाच्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मोह्फुले वेचणे बेतले जीवावर 


भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) पवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कन्हाळगाव परिसरात जंगल असून येथे वन्यप्राण्यांचा देखील वावर आहे. दरम्यान नेहमी प्रमाणे सीताबाई दडमल या गावालगतच्या जंगल परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेल्या होत्या. पहाटे घरून निघालेल्या सीताबाई दुपार होऊनही घरी परतल्या नाही, त्यामुळं कुटुंबियांसह ग्रामस्थांनी महिलेचा जंगल परिसरात शोध घेतला. दरम्यान बराच वेळ शोध घेतल्या नंतर झाडीमध्ये सीताबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वन विभाग आणि पोलिसांनी (Bhandara Police) पुढील कारवाई करत हा मृतदेह दडमल कुटुंबियांच्या हाती सुपूर्द केला. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


दहशत मांजवणारा बिबट्या अखेर जेरबंद


गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर (Malkapur) तालुक्यातील वाकोडी परिसरात बिबट्याची दहशत होती. अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना हा बिबट्या नजरेस पडला होता. मात्र आज वनविभागाच्या पथकाने लावलेल्या जाळ्यात हा बिबट्या अडकला. वनविभागाने तात्काळ या बिबट्याला ट्रोकीलायझर देऊन बेशुद्ध केल. मादी जातीचा असलेला हा बिबट्या अनेक दिवसापासून या परिसरात धुमाकूळ घालत होता.


आखेर आज या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आहे आहे. सध्या या बिबट्याची वैद्यकीय चाचणी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दहशत मांजवणाऱ्या हा बिबट्याला जेरबंद केल्याने मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या