बारातमी: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढाई होणार आहे. अजित पवार यांच्या पाठिशी भाजपच्या महाकाय यंत्रणेची ताकद उभी असली तरी बारामतीची लढाई त्यांच्यासाठी म्हणावी तितकी सोपी दिसत नाही. कारण, पवार कुटुंबातील बहुतांश सदस्य शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. आपले आज जे काही अस्तित्त्व आहे, ते शरद पवार यांच्यामुळेच आहे, असे खडेबोल पवार कुटुंबीयांकडून अजित पवार यांना सुनावण्यात आले आहेत. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर अजित पवार हे एकटे पडले आहेत.
अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे संपूर्ण कुटुंबच शरद पवार यांच्या बाजूने रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत युगेंद्र पवार बारामतीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यादेखील अजितदादांविरोधात सक्रिय झाल्या आहेत. शर्मिला पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या डोळ्यात एकप्रकारे अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत लोकसभेत शरद पवार आणि अजित पवार आमदार, असं चालत आलं होतं. एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो. सगळं एकट्यानेच खायचं नसतं, असे शर्मिला पवार यांनी म्हटले.
पंतप्रधान झालात तरी चुलत्याच्या पुढे जाऊ नका; शर्मिला पवारांचा अजितदादांना टोला
शर्मिला पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावरती आहेत इंदापूर तालुक्यातील उद्धट गावात त्या एका कार्यकर्त्यांना बोलत असताना चुलत्याच्या पुढे जायचं नाही असं म्हणाल्या. तू काहीही हो, तू सरपंच हो, पंतप्रधान हो प्रेसिडेंट हो, तू काहीही हो, पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता मान तो मान, हा सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे. एका कार्यकर्त्याचं नाव घेऊन शर्मिला पवार बोलत होत्या. बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल भोर येथील जनता काय लेचीपेची नाहीये. ती साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे . येणाऱ्या 7 तारखेला दाखवून देणार आहे की जनतेचा कौल हा निश्चितपणे साहेबांच्या आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आहे, असे शर्मिला पवार यांनी म्हटले.
रोहित पवार आणि युगेंद्र खंबीर आहेत, घेराव घालणाऱ्या लोकांना त्यांची चूक कळाली: शर्मिला पवार
शर्मिला पवार यांनी सोमवारी इंदापूर भागाचा दौरा केला. यावेळी शर्मिला पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. माझ्या इंदापुरातील दौऱ्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युगेंद्र पवार यांना बारामतीत काही लोकांनी घेरले होते. या लोकांना त्यांची चूक कळाली असेल. रोहित पवार आणि युगेंद्रदादा खंबीर आहेत, असे शर्मिला पवार यांनी म्हटले.
बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमकीचे फोन; शर्मिला पवार यांचा आरोप
बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या बाजूने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप शर्मिला पवार यांनी केला. अनेक गावांमधील ज्येष्ठ सांगतात की, आम्हाला पोलिसांकडून धमकीचे फोन येत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी सुप्रिया सुळे प्रचारासाठी आले आहे. आम्हाला तरुणांचा मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज पसरवले जात आहेत. पण बारामती आणि इंदापूरमधील लोकांना काहीही सांगण्याची गरज नाही. विरोधकांकडे आता मुद्दे उरले नसल्याने श्रीनिवास पवार यांचे वक्तव्य स्वत:शी जोडून घेतले, असे शर्मिला पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
तुमची साथ असेल तरच मोठं पाऊल उचलेन, बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य