Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) रस्सीखेच सुरु आहे. जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. याच अस्वस्थतेतून नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल (दि. 24) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निवासस्थान गाठून मोठे शक्तीप्रदर्शन केले. 


नाशिक लोकसभेसाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडूनही चाचपणी सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवल्याचे चित्र आहे. नाशिकची पारंपारिक जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे जागा आपल्यालाच मिळणार, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना व्यक्त केला आहे. 


नाशिकची पारंपारिक जागा शिवसेनेचीच


खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून शिवसैनिकांची इच्छा होती की, नाशिकची पारंपारिक जागा ही शिवसेनेची आहे. इतर पक्ष नाशिकच्या जागेवर दावेदारी करत आहेत. तर आपल्याकडूनदेखील या जागेसाठी दावेदारी करावी, अशा शिवसैनिकांच्या भावना होत्या. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही ठाण्यात गेलो होतो. 


मुख्यमंत्र्यांची हेमंत गोडसेंना ग्वाही


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आम्हाला सांगितले की, शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या आमच्यादेखील आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून नाशिकची (Nashik) जागा आपण शिवसेनेसाठी सोडवून घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिली आहे. 


प्रत्येक पक्ष दावेदारी करतो, पण...


भाजपमधून (BJP) इच्छुक उमेदवार आहेत, राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचे नाव आघाडीवर आहे, नाशिकची जागा राष्ट्रवादीने लढवावी, असे मागणी होत आहे. यावर हेमंत गोडसेंना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक पक्ष प्रत्येक मतदारसंघावर दावेदारी करत असतो.  भाजपने, राष्ट्रवादीने दावा केला आहे. परंतु आमची जागा पारंपारिक आहे. गेली अनेक वर्ष शिवसेना ही जागा लढवत आहे. 2014 सालापेक्षा 2019 साली आमचे मताधिक्य वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला या जागेवर पुन्हा एकदा यश मिळेल हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिकवरून महायुतीत धुसफूस वाढली! गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिक भाजपचा मोठा निर्णय!


धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे शांतीगिरी महाराजांच्या भेटीला, नाशिक लोकसभेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता