Balasaheb Thorat काँग्रेस पक्षाला नवचैतन्य आणण्यासाठी एकीकडे राहुल गांधींची देशभरात भारत जोडो यात्रा पूर्ण झाली. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींनी पायी दौरा करत ही यात्रा केली. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहिलंय. विधानपरिषद निवडणुकांमध्ये सत्यजित  तांबे प्रकरणावरून या वादाला तोंड फुटलं आहे. या निवडणुकीत नाना पटोले यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासोबत कसं काम करायचं? असा प्रश्न  थोरात यांनी पत्रात उपस्थित करत हायकमांडकडे तक्रार केली आहे. 


नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार फक्त बाळासाहेब थोरात यांनीच केली नाही. तर विदर्भातील काही काँग्रेसच्या नेत्यांनीही केलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर नाना पटोले हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर त्यांची भूमिका ही वेगळ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची होती. मात्र आमच्या आग्रहानंतर काँग्रेसचा उमेदवार दिला आणि तो निवडून आला. मात्र आता नाना पटोले श्रेय घेतात. अशा प्रकारची तक्रार विदर्भातील काही नेत्यांनी हायकमांडकडे केली आहे.


नाना पटोले हे राज्यातील कांग्रेस नेत्यांना महत्व देत नाही. त्याचसोबत नाना पटोले यांच्या काही निर्णयावरही या नेत्यांनी बोट ठेवलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आरएसएसच्या जवळ असलेले छोटू भोयर यांना दिलेल्या उमेदवारीचाही संदर्भ देत ही तक्रार करण्यात आली आहे. खरं तर महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांचे मोठे गट तट पाहायाला मिळतात.  सध्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन दिग्गजांचे मोठे गट आहेत. नाना पटोलेही आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी नाना पटोले यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध इतर काँग्रेसचे नेते असा अंतर्गत संघर्ष वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे नाना पटोले यांनी आमंत्रित कलेल्या पक्षाच्या अनेक बैठकांकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवेलेली पाहायला मिळते.  त्यामुळे समोर ठाकलेल्या भाजपच्या आव्हानापेक्षा काँग्रेसमधील नेत्यांना आपल्याच पक्षातील नेत्यांचं एकमेकांना मोठं आव्हान आणि महत्वाचं वाटू लागलं आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत असलेली ही मोठी गटबाजी काँग्रेससाठी घातक ठरु लागली आहे. या गटबाजीवर आणि तक्रारीवर काँग्रेसचे हायकमांड काय निर्णय घेणार? हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे. 


आणखी वाचा :
Patole vs Thorat : बाळासाहेब थोरातांनी दिलेल्या पत्रासंदर्भात पटोले, वडेट्टीवार म्हणतात...