Nagpur News : नागपूर शहरात 24 तासांत चार आत्महत्यांची नोंद झाली आहे. नोकरीवरून काढल्याने तणावात असलेल्या एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन जीव दिला, तर रागाच्या भरात एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. जरीपटका, पाचपावली, शांतीनगर व कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निवासी प्रशांत उत्तमराव भगत (वय 40, स्वर्णनगर) हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांना नोकरीवरून काढण्यात आले होते. यातून ते तणावात होते. त्रासाला कंटाळून त्यांनी ऑटोमोटिव्ह चौकाजवळील एका विहिरीत उडी घेतली. त्यांचे प्रेत तरंगताना आढळल्याने ही बाब उघड झाली. कपिलनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसरी घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली. सीमा कैलाश कनोजिया (वय 38, रा. मिसाळ ले-आऊट, तथागत कॉलनी) यांनी दुपारी चार वाजता रागाच्या भरात घरात बेडरूममध्ये विष प्राशन केले. त्यानंतर प्रकृती खराब झाली. त्यांचे पती व मुलाने त्यांना उपचारासाठी इंदोरा चौक येथील एका इस्पितळात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
दरम्यान, पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत धीरज वसंता तराळे (वय 35, रा. पंचशीलनगर) यांनी अज्ञात कारणावरून घरी कुणीच नसताना सिलिंग फॅनला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तर शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दीक्षा दिलीपसिंग भारद्वाज (वय 28, रा. प्रेमनगर) हिनेदेखील अज्ञात कारणावरून गळफास घेतला. सकाळी ती बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या एका तरुणाचा अखेर मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राहुल दिलीप कांबळे (वय 23) असे मृताचे नाव आहे. 29 जानेवारी रोजी राहुल कांबळे हा तरुण त्याचा लहान भाऊ कुणाल याच्यासोबत मोटारसायकलने जबलपूर महामार्गाने जात होता. ओरिएन्टल कंपनी जवळ अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. ट्रकचा वेग जास्त असल्याने धडकेने मोटारसायकलवरून दोघेही खाली पडलेव राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणालच्या हाताला दुखापत झाली. राहुलला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला.
ही बातमी देखील वाचा...