Yes Bank scam : येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर (Rana Kapoor) आणि संजय थापर यांच्यासह इतर सात जणांना बुधवारी दिल्लीतील एका मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाला आहे. मात्र, राणा कपूर यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास अद्याप सुरूच असल्यानं त्यांना तूर्तास जेलमध्येच राहावं लागाणार आहे.


राणा कपूर यांची पत्नी बिंदू यांच्या मालकीच्या दिल्लीतील मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मुंबईत स्वतंत्रपणे करत आहे. त्यानंतर सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कपूर, थापर आणि इतरांविरोधात तपास सुरू केला. तर दुसरीकडे, थापर यांच्या फर्मला बेहिशेबी कर्ज आणि सवलती दिल्यानंतर राणा कपूर यांनी दिल्लीतील 'अवंथा' रियल्टी लिमिटेड (एआरएल) या मालमत्तेच्या रूपात बेकायदेशीररित्या नफा मिळवून दिल्याचं सीबीआयनं दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलेलं आहे. 


राणा कपूरनं एआरएलशी संगनमत करून नवी दिल्लीतील एका मोक्याच्या जागेवर असलेली मालमत्ता आपल्या पत्नीच्या मालकीच्या 'ब्लिस अ‍ॅबोड' नावावरील फर्मला चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यास परवानगी दिली. राणा कपूरने अवंथाच्या दोन समूह कंपन्यांमध्ये मासिक भाडे करार तयार केला आणि ती मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून येस बँकेकडून 400 कोटींचं कर्ज मंजूर केलं. मात्र, या मालमत्तेची मूळ किंमत 550 कोटी इतकी होती, असे ईडीनं गेल्या वर्षी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलेलं आहे. त्यावर बुधवारी न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. 


"थापर यांनी तपासयंत्रणेला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे. ईडीनं त्याची चौकशी करून आपलं उत्तर दिलेलं आहे. तसेच न्यायालयाच्या अटींचे पालन करण्यास तयार आहेत, तर कपूर यांना या प्रकरणात कधीही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, त्यांनी या तपासात पूर्ण सहकार्य केल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले.


वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयाने राणा कपूर, बिंदू कपूर, गौतम थापर आणि अन्य सात आरोपींना जामीन मंजूर केला. या प्रकरणात कपूर पती-पत्नी आणि थापर यांना जामीन मिळाला असला तरीही अद्यापही त्यांच्यावर इतरही काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना तूर्तास कारागृहातच रहावं लागणार आहे.  


मत्वाच्या बातम्या


YES Bank Crisis | येस बँक उद्ध्वस्त करण्यामागे थ्री सिस्टर्सचा हात


Yes Bank Crisis | येस बँकेच्या खातेदारांचे पैसे कौटुंबिक स्वार्थासाठी वापरले?