Badlapur: कुत्रा मागे लागला म्हणून रस्त्यावर पळत असलेल्या मुलाला कारने उडवल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बदलापूरला राहणारा प्रेम दुबे हा 16 वर्षांचा मुलगा 9 मे रोजी सकाळी 6.30 वाजता कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी निघाला होता. बेलवली परिसरातील डी अड्डा हॉटेलच्या परिसरात तो आला असता एक भटका कुत्रा त्याच्या अंगावर आला. कुत्र्याला घाबरुन तो पळत रस्त्यावर आला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारने त्याला जोरदार धडक दिली. कुत्रा मागे लागल्यानंतर मुलगा अचानक पळत रस्त्यावर आल्याने कार चालकाचे ब्रेक लागले नाहीत आणि त्याने या मुलाला धडक दिली.


जखमी झालेल्या मुलाला स्वतः कारचालकाने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अपघाताला कुत्रा कारणीभूत असल्याचं निष्पन्न झालं. या अपघातानंतर मुलाला 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अपघातात मुलाच्या डोक्याला मार लागल्यानं अजूनही तो पूर्णपणे शुद्धीत आलेला नाही, त्यामुळे अपघाताच्या एक आठवड्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू असून यात कार चालकाची चूक आहे का? हे पडताळून मग पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी दिली आहे


महिनाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील घडली होती अशी घटना


मार्च महिन्यात गंगापूरच्या कोडापूर येथील एका साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता. दरम्यान 22 दिवसांच्या उपचारानंतर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. धनराज पांडुरंग सरोदे (वय साडेतीन वर्षे) असं या मुलाचं नाव होतं. शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या आईसोबत शेतात गेलेल्या धनराजवर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने गावात मोठी खळबळ उडाली होती. तर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत होतं. या हल्ल्यात धनराज गंभीर जखमी झाला होता. पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्या तोंडाचे अक्षरशः लचके तोडले होते. त्यामुळे त्याच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. तर गालावरील जखमा खोलवर असल्याने धनराजला प्रचंड त्रास होत होता, 22 दिवसांपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. विशेष म्हणजे त्याची प्रकृती ठीक होत नसल्याने त्यास घरी नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र 22 दिवसांच्या उपचारानंतर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.


हेही वाचा:


Mumbai: मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देतो म्हणत तरुणाची लाखोंची फसवणूक, आरोपीस दिल्लीतून अटक