Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Elections) अनुषंगाने महत्वाचे आदेश काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी 16 मतदार केंद्रावर 18 मे रोजी सकाळी 7.30 ते सांय. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 19 मे रोजी रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) अनुषंगाने मतदान केंद्र व मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
 
हिंगोली  तालुक्यासाठी  प्रस्तावित  मतमोजणीचे  ठिकाण  तहसील  कार्यालय  हिंगोली, कळमनुरी तालुक्यासाठी निवडणूक हॉल तहसील कार्यालय कळमनुरी, सेनगाव तालुक्यासाठी  सेनगाव तहसील  कार्यालयातील  मिटींग  हॉल  येथे, औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी तहसील  कार्यालयातील महसूल हॉल क्र. 1 येथे व वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तहसील  कार्यालयातील निवडणूक विभाग हॉलमध्ये 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 


हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीसाठी 16 मतदार केंद्रावर 18 मे रोजी सकाळी 6.00 ते सांय.6.00 वाजेपर्यंत, तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 19 मे रोजी सकाळी 7.00 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वरील मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत. हे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसर व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत.  तर हे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी, कर्मचारी व मतदान केंद्राच्या परिसरातील  मतदारास  लागू  होणार  नाहीत. 


आणीबाणीच्या प्रसंगी फौजदारी कारवाई 


मतदान  केंद्राच्या  परिसरात व  मतमोजणीच्या ठिकाणी 100 मीटरच्या आत खाजगी वाहन घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli: हिंगोलीत प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेवर दोन बालविवाह थांबविण्यात यश