Latur Crime News: साखरझोपेत असलेल्या नागरिकांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. जवळपास दोन तास फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. यामध्ये पाच दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. तर, एक दरोडेखोर पळून जाण्यास यशस्वी झाला. लातूर शहरात (Latur) सध्या पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.  


लातूर शहरातील रिंग रोड भागातील डी मार्ट शॉपिंग मॉलच्या बाजूला असलेल्या अपार्टमेंटमध्ये मध्यरात्रीनंतर सहा चोरांनी दरोडा टाकला. त्याशिवाय, एक पोलीस कर्मचारी आणि एका शिक्षकाच्या घरातही दरोडेखोरांनी चोरी केली. या चोरीत 14 तोळे सोनं आणि साडेचार हजार रुपये नगदी असा ऐवज लुटून हे चोर साडेतीन वाजता तिथून बाहेर पडले. या भागात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याच वेळी रात्री गस्तीवर असलेल्या पथकांनी याची नोंद घेतली. स्थानिक गुन्हे शाखा विभाग, विवेकानंद पोलीस ठाणे, रेणापूर पोलीस ठाणे आणि रात्रीचे गस्त पथक यांनी एकत्रित कारवाई सुरू केली. या सर्व पथकामध्ये उत्तम संभाषण आणि ताळमेळ होता. 


यातच रात्री गस्ती पथकातील काकासाहेब बोचरे आणि युवराज गिरी या कर्मचाऱ्यांना दुचाकीवर सहाजण भरधाव जात असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या दुचाकीस्वारांचा पाठलाग सुरू केला. याची माहिती पोलीस मुख्यालयाला देण्यात आली. त्यानंतर सर्व पथके सक्रिय झाली आणि एकत्रित कारवाईला सुरुवात करण्यात आली. पोलिसांची एक गाडी सातत्याने पाठलाग करते हे लक्षात आल्यानंतर हे दुचाकीस्वार कच्चा रस्त्यातून, शेताच्या रस्त्यातून दुचाकी पळवू लागले. मात्र, पोलिसांनी केलेल्या पाठलागामुळे त्यांनी आपल्या दुचाकी टाकून दिल्या आणि ते उसाच्या फडात जाऊन लपले. 


त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या फडाला चहूबाजूंनी घेरले. पहाटे पाच वाजल्यानंतर दिवस उजडू लागला होता. त्याच काळात सहापैकी एका चोराला पळून जाण्याची संधी मिळाली. मात्र,  पोलिसांनी इतर पाच चोरांना अटक करण्यात यश मिळवलं. उसाच्या फडात लपलेल्या चोरांनी पोलिसाला गुंगारा देण्यासाठी दोन तास सतत प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांनी चोरांचा पाठलाग काही केल्या सोडला नाही. त्यामुळे सहापैकी पाच चोर हाती लागले. त्यांनी अंगावरचे कपडे मुद्देमाल त्यांनी वेगवेगळ्या भागात फेकून दिले होते. ते ही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. चोरांकडे कत्ती काठी,  लोखंडी रॉड,  चाकू आदी शस्त्रे होती. 


दरोडेखोराकडून दरोड्यात चोरलेला जवळपास 14 तोळे सोन्याचे विविध दागिने तसेच 4,500 रुपये रोख रक्कम असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या दरोडेखोरांनी पोलीस ठाणे रेणापूर हद्दीत जबरी चोरी, घरफोड्या तसेच लातूर शहरांमध्ये व जिल्ह्यात इतर ठिकाणी घरफोड्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे दरोडेखोराकडून जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हे सर्व चोर बीड अहमदनगर आणि औरंगाबाद भागातील आहेत. त्यांनी सातत्याने या भागात चोरी केली आहे.  पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करत पोलिसांनी दरोडेखोरांना बेड्या ठोकले आहेत. रात्री गस्तीवरील पथकाने केलेल्या या उत्तम कामगिरी लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्याची शिफारस ही करण्यात येणार असल्याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी दिली आहे.