Prakash Shendge : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shedge) यांनी ओबीसींच्या (OBC) पक्षाची घोषणा केली आहे. अधिकार असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही. त्यामुळे पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओबीसी पक्षाचे नाव, कार्यकारिणी याबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


प्रकाश शेंडगे म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचे (OBC Reservation) तीन तेरा वाजताना आपण पाहत आहोत. मराठा समाजाने सत्तेच्या माध्यमातून सत्तेवर दबाव टाकून आमच्या आरक्षणाचा सत्यानाश केला आहे. ओबीसी भटके मुक्त, मागासवर्गीय समाज आणि सर्व मिळून आपलं राज्य आणायचं असं ठरलं आहे. यासाठी राजकीय पक्ष काढण्याचा ठराव मंजूर झाला आहे. आता ही आरक्षणाची लढाई राजकीय लढाई म्हणून येऊन ठेपली आहे.


पक्ष स्थापन करण्याशिवाय पर्याय नाही - प्रकाश शेंडगे


ओबीसी समाजाची संख्या 60 ते 65 टक्के एवढी असताना सुद्धा सगळे खासदार मराठा, सगळे आमदार मराठा, घटनेचा अधिकार असताना सुद्धा सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊन दिला नाही. आता पक्ष स्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे उरला नव्हता. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन ओबीसीचा पक्ष स्थापन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. यासाठी 15 जणांची कमिटी नेमली आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.


आमच्याकडे पैसा नव्हे मात्र लोकशक्ती आहे - प्रकाश शेंडगे


केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला सुद्धा पाहायला मिळेल. मागील 75 वर्षात जे पाहायला मिळाले ते यापुढे न पाहण्यासाठी आता आम्ही उतरलो आहोत. आमच्याकडे साधना नाहीत आमच्याकडे पैसा नाही. पण, आमच्याकडे लोकशक्ती आहे. आमच्याकडे वोट बँक आहे. मराठा आरक्षणासाठी आमच्या आरक्षणाचा घास घेईपर्यंत षडयंत्र झालं. त्यामुळे आमच्या पक्षात पुढे इतर कुठल्याही पक्षाचा निभाव लागेल, अशी शक्यता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.


ओबीसी महासंघाची राजकीय मनीषा नाही - बबनराव तायवाडे


प्रकाश शेंडगे यांच्या भूमिकेवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षाचे नेते आहे. आम्ही समाजासाठी काम करतो. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा आहे. मात्र यांच्या राजकीय भूमिकेबद्दल आमच्या भूमिकेचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत निर्णय घेतला जाईल. सध्यातरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कोणतीही राजकीय मनीषा नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 


भुजबळांनी नाभिक समाजाचा अपमान केला नाही - बबनराव तायवाडे


ते पुढे म्हणाले की, आमच्या ओबीसी समाजात चार हजार वेगवेगळ्या संघटना आहे. त्यामुळे थोडी मतभिन्नता असली तरी एकी आहे. ओबीसीमधील अल्पसंख्याक जातींना पुढे यायचे असेल तर त्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कुठेही नाभिक समाजाचा अपमान केला नसल्याचेही तायवाडे म्हणाले.


आणखी वाचा 


Nashik News : मालेगाव शहराचा उल्लेख 'मिनी पाकिस्तान'; नितेश राणेंच्या विरोधात आसिफ शेख यांनी पाठवली नोटीस