मुंबई : एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आता रोजच नवनवेखुलासे होत आहेत. या हत्येचे धागेदोरे थेट बिश्नोई गँगशी जोडले गेले आहेत. दरम्यान, या हत्येसाठीच्या फंडिंगबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातूनही फंडिंग करण्यात आली होती.
हत्येसाठी 17 लाख रुपयांची सुपारी
एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी नुकतेच चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये हत्येसाठी लागणाऱ्या फंडिंगबाबत माहिती देण्यात आलेली आहे. चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी एकूण 17 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या सुपारीचे पैसे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातून जमा करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रान्चनुसार सिद्दीकी यांच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने फंडिंग केली होती. त्यासाठी या गँगशी जोडलेल्या लोकांनी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या म्हणण्यांनुसार कर्नाटकमध्ये खोललेल्या एका बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले होत
उत्तर प्रदेशात स्लिपर सेलची मदत
चार्चशीटनुसार सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपी सलमान वोहरा याच्या नावावर कर्नाटकमधील आणंद येथे बँक खाते खोलण्यात आले होते. या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेण्याची जबाबदारी शुभम लोणकर याला देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक स्लिपर सेल उत्तर प्रदेशमधून वेगवेगळ्या सीडीएम मशीनमधून हे पैसे ट्रान्सफर करत होता.
60 ते 70 टक्के रक्कम दोन राज्यांतून मिळवली
मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या सुपारीची रक्कम महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांतून जमा करण्यात आली होती. सुपारीच्या एकूण रकमेपैकी 60 ते 70 टक्के रक्कम ही याच दोन्ही राज्यांतून मिळवण्यात आली. सिद्दीकी यांच्या हत्येसाठीच्या सुपारीची 17 लाख रुपयांची रक्कम देशातील वेगवेगळ्या भागातून जमा करण्यात आली होती. ही सर्व रक्कम देशांतर्गतच असून अद्यापतरी विदेशातून फंडिंग मिळवल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.
उत्तर प्रदेशमधून झालेल्या फंडिंगबाबत अद्याप माहिती नाही
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी लागणारे काही पैसे हवालाच्या माध्यमातूनही आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आले होते. पोलिसांनी कर्नाटकच्या बँक खात्यांच्या माध्यमातून झालेल्या फंडिंगची माहिती तर मिळवली आहे. मात्र उत्तर प्रदेशमधून झालेल्या फंडिंगबाबत अद्याप पोलिसांना अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. त्यामुळे भविष्यातही या प्रकरणात नवनवे आणि धक्दादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :