मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलीस आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एकूण 26 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. यात शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. या हत्येमागील कारणाबाबत मुंबई गुन्हे शाखेला अद्याप काहीही ठोस सापडले नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. मात्र मुंबई क्राईम ब्रँचने एसआरए वादाच्या ही हत्या झाली आहे का? याचा तपास केला असता पोलिसांना एसआरए प्रकल्पामुळे ही हत्या झाली असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसल्याचेही बोलले जात आहे. 


हत्येमागील मूळ कारण अद्याप अस्पष्ट


मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यातील जवळीकता यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील अटक आरोपी हे दिलेल्या टास्कनुसार काम करत होते. त्यामुळे हत्येमागील मूळ कारणाबाबत त्यांनाही फारशी माहिती नसल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांना अटक होईपर्यंत या हत्येमागचे खरे कारण स्पष्ट होणार नसल्याचे मत तपास अधिकार्‍यांचे आहे.


पोलीस तपासात धक्कादायक खुलासा 


महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे.


दरम्यान, यापूर्वी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आकाशदीप नावाच्या आरोपीला पंजाबमधील फाजिल्का येथून अटक करण्यात आली होती. अटक आरोपी आकाशदीप गिलने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या चौकशीदरम्यान गिलने बाबा सिद्दीकी हत्याकांडातील गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे उघड केले. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या