मुंबई : विधानसभेचा निकाल लागून 16 दिवस झाले असले तरी अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. मात्र आता राज्यातील सत्तासंघर्ष नव्या वळणावर आला आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेचं बिनसलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार येणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आता शिवसेना जाणार का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


शरद पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळपासूनच मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. काँग्रेसच्या राज्यातील सर्वच बड्या नेत्यांनी आज पवारांची भेट घेत राजकीय स्थितीवर चर्चा केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिवसभरात दोन वेळा शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर करत, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


उद्धव ठाकरे यांनीही आज पत्रकार परिषद घेत भाजपबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. यावेळी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असं वचन दिलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपची  गरज नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे भाजपला दूर ठेवून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.


राज्यातील सत्ताकोंडीला भाजपचं जबाबदार असल्याच आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्यात सरकार कोणाचं येणार हे राज्यपाल ठरवतील. सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण द्यायला हवं. राज्यपाल आता कुठलं पाऊल उचलतात याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.


जनतेनं योग्य तो निर्णय घेतला आहे. भाजपच्याही लक्षात आलं आहे की आता जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. कितीही प्रयत्न केले तरी भाजपला राज्यात सत्ता स्थापन करता येणार नाही, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली.