मुंबई :  हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज येण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिली आहे.


ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने कृषीमंत्री भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार यांच्यासह स्कायमेट वेदर सर्विसेसचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात मंडळस्तरावर 2 हजार 119 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सध्या या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतस्तरावर ही स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्याचा विचार सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 6 हजार ग्रामपंचायतींमध्ये ही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जातील, असे सांगण्यात आले आहे.


ज्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यावेळी विमा कंपन्या ह्या स्कायमेट कडूनच सर्व माहिती घेतात. आता ही व्यवस्था मंडळाच्या ठिकाणीच आहे. त्यामुळे तत्परता येत नाही. उद्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली तरी तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेषत: पीक विमा नुकसानभरपाईच्या दरम्यान याचा लाभ होणार आहे. 


आदर्श गांव' योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषी योजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातही मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.  लोकसहभागातून ग्रामविकास ही 'आदर्श गांव' निर्मितीची संकल्पना आहे. हिवरे बाजार सारख्या गावाने त्या माध्यमातुन विकास साधला आहे. या योजनेत सहभागी इतर गावांमध्ये कृषी विषयक योजनांची सांगड घातली तर ग्रामविकासाला अधिक गती मिळेल, असे यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: