सांगली : महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्बंध वाढवले गेलेत. सांगली जिल्ह्यात (Sangli Corona updates) देखील निर्बंध वाढवण्याबरोबरच पोलिसांनी जिल्हात ठिकठिकाणी नाकाबंदी करत विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे. मात्र सांगलीवाडीत मागील 2 दिवसापासून रात्रीच्या सुमारास कोरोनाचे निर्बंध न पाळता प्रचंड गर्दीत कबड्डीचे सामने पार पडत आहेत. या गर्दीकडे  मात्र महापालिका, पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महापालिका आयुक्तांनी मनपा क्षेत्रात मोठ्या गर्दीमध्ये होणारे कार्यक्रम, जाहीर सभा, खुल्या जागेवरील कार्यक्रम घेण्यास मनाई केली असताना देखील प्रचंड गर्दीत आणि कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता खेळवल्या जाणाऱ्या या कबड्डी सामन्याना का बंदी घातली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. सांगली जिल्ह्यातील कालची रुग्णांची आकडेवारी वाढून ती 100 च्या जवळ पोहोचलीय. महापालिका क्षेत्रात देखील कोरोना रुग्णसंख्या 39 इतकी आहे. तसेच मनपा क्षेत्रात 2 ओमायक्रॉन रुग्ण देखील सापडले होते. 


सांगली जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचे निर्बंध झुगारुन गर्दीचे कार्यक्रम, खुल्या मैदानावरील कार्यक्रम प्रचंड गर्दीत बिनधास्तपणे पार पडत आहेत. सांगलीत कोरोनाचे नियम मोडले म्हणून सर्वसामान्यांवर दंडाची कारवाई करणारे महापालिका प्रशासन प्रचंड गर्दीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमाकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक करताना दिसत आहेत. सांगलीवाडीत नदी काठच्या चिंचबाग मैदानावर प्रचंड गर्दीत आणि कोरोनाचे नियम डावलून कबड्डी स्पर्धा या खेळवल्या जात आहेत. ना या सामन्याच्या आयोजकांच्या तोंडावर मास्क दिसतोय ना दाटी वाटीने कबड्डी सामने पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांच्या तोंडावर मास्क दिसतोय. इतकी प्रचंड गर्दी होऊन आणि कोरोनाचे सर्व नियम डावलून देखील या कार्यक्रमाच्या आयोजकांवर महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली नाही.


विशेष म्हणजे एकीकडे हे कबड्डी सामने पार पडत असताना महापालिका क्षेत्रात प्रदर्शने, मेळावे, स्पर्धा, खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नका असे आदेश  आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिलेत. याचबरोबर  कोरोना नियम तोडणाऱ्यावर महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून  कारवाई देखील सुरू केलीय. त्यामुळे कोरोनचे नियम मोडले म्हणुन सर्वसामान्याकडून दंड वसूल करणारे मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन या कबड्डी स्पर्धावर बंदी आणून कोणतेही नियम न पाळता प्रचंड गर्दी जमा केल्याबद्दल आयोजकांवर कारवाई का करत नाही हा प्रश्न आहे.


आयुक्तांचे केवळ आदेश, मात्र अंमलबजावणी नाही


कोरोना आणि ओमयक्रोनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कापडणीस यांनी आपल्या वैद्यकीय यंत्रणेला अलर्ट केले . अन्य जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात रुग्ण सापडण्याचे प्रमाण सध्या तरी कमी असले तर रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यापुढे रुग्ण वाढलेच तर त्यांच्यावर उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेशही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिले. कोरोनाची परिस्थिती पाहता प्रदर्शने, मेळावे, स्पर्धा, खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नका असेही आदेश कापडणीस यांनी दिले. याचबरोबर कोरोना नियम तोडणाऱ्यावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करा असे आदेश आयुक्तांनी दिलेत. महापालिका क्षेत्रात कोरोना पसरू नये यासाठी दक्ष राहा असे सांगत नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं , मास्क वापरावे असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलेय.


सांगलीतील सध्याचे निर्बंध


लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच उपस्थित राहण्यास परवानगी असेल


इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल


अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या 20 पर्यंत मर्यादित असेल


या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी


 या आदेशाचे पालन न करणाऱ्या  कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल