Ashadhi Wari 2022 : सलग दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळयात खंड पडला होता. मात्र, यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा वारकऱ्यांना पालखी सोहळ्यासोबत पंढरीची वाट चालायचे वेध लागले आहेत. ग्रामीण भागातून संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज या मानाच्या मानल्या जाणाऱ्या पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं आहे. याच दरम्यान खबरदारी म्हणून पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


या संदर्भात पुण्याचे SP अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजित ठिकाणी 2 एसआरपीएफची (SRPF) तुकडी तैनात असणार आहे. तसेच, 1800 पोलिस कर्मचारी आणि 1000 होम गार्ड तैनात असणार आहेत. रस्त्याची कामे, प्रसाधनगृह, भविकांसाठी सोयी सुविधा याचा आढावा घेण्यात आला आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी सध्या वेशातील पोलिस देखील असणार आहेत. ट्रॅफिक diversion होणार असल्या कारणाने एक व्हिडीओ त्याबद्दल जाहीर केला जाईल.


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूहून प्रस्थान


पंढरपूरची या वर्षीची आषाढी वारी 10 जुलैला संपन्न होत आहे. या वारीसाठी श्री क्षेत्र देहू संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी देहूहून प्रस्थान झाली आहे. तुकोबारायांच्या या पालखी सोहळ्यासाठी आज कोल्हापुरातील छत्रपती घराण्याकडून जरीपताका आणि ध्वज अर्पण करण्यात आला आहे. सुरुवातीला भवानी मातेसमोर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या जरीपताका आणि ध्वजाचं पूजन झालं. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी जरीपताका आणि ध्वज अर्पण करण्याची परंपरा या वर्षीपासूनच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने सुरु केली आहे. 


संत नामदेवांच्या पालखी निमित्ताने वारकऱ्यांचा भव्य रिंगण सोहळा


दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी नामदेव महाराजांचा पायी निघालेला पालखी सोहळा वारकऱ्यांमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करणारा आहे. या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा नवचैतन्य आणि नवा आनंद दिसून येत आहे. 22 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होणार आहे. शेकडो वारकऱ्यांसह आज पालखी हिंगोली शहरामध्ये दाखल होणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम हिंगोली शहरामध्ये होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :