Ashadhi Wari 2022 : दोन वर्षांनंतर पालखीच्या सोहळ्याने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमली आहे. भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराज (Sant Namdeo Maharaj) यांची पालखी आज नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. या पालखीला 26 वर्षांचा इतिहास आहे. पालखीच्या या सोहळ्यात वारकरी पायी प्रवास करुन पंढरपूरला जात असतात. 

  


मागील दोन वर्षांत कोरोनामुळे या पालखी सोहळ्याला खंड पडला होता. परंतु, दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी नामदेव महाराजांचा पायी निघालेला पालखी सोहळा वारकऱ्यांमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करणारा आहे. या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा नवचैतन्य आणि नवा आनंद दिसून येत आहे.


22 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होणार आहे. शेकडो वारकऱ्यांसह आज पालखी हिंगोली शहरामध्ये दाखल होणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम हिंगोली शहरामध्ये होणार आहे. 


हिंगोली शहरामध्ये वारकऱ्यांचा रिंगण सोहळा 


दरवर्षी हिंगोली शहरामध्ये संत नामदेव महाराजांची पालखी आल्यानंतर प्रशासकीय रिंगण सोहळा आयोजित केला जातो. जिल्हाभरातील शेकडो वारकरी या रिंगण सोहळ्याला आपली हजेरी लावतात. हा रिंगण सोहळा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. प्रशासनाच्या वतीने रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिंगोली शहरांमध्ये संत नामदेव महाराजांची पालखी दाखल झाल्यानंतर सर्व वारकरी रामलीला मैदानावर जमतात आणि या ठिकाणी या रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. 


महत्वाच्या बातम्या :