Maharashtra Rain : राज्यात मान्सूनचं आगमन मात्र, पाऊस मात्र पडताना दिसत नाही. राज्याच्या काही भागात अल्प प्रमाणात पाऊस पडला मात्र, अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. महाराष्ट्रात म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा सरला तरी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. अशातच आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
आजपासून राज्यातील मुंबईसह, ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि किनारपट्टीच्या आसपासच्या भागात पुढील 3 ते 4 तासात पाऊस पडण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.
आज पहाटेपासूनचं मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
राज्याच्या काही भागात सुरुवातील पावसानं चांगली हजेरी लावली होती. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, पावसानं पुन्हा दडी मारली आहे. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: