भिवंडी : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्ह असून ओमायक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूने हाहाकार माजवण्यास सुरवात केली आहे. अशातच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या वस्तीगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर घाबरलेल्या पालकांनी बाधित मुलांसह सर्वच मुलांना घेऊन पळ काढला आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार संबधित आश्रमशाळेत, राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकला जाणवू लागल्याने मुख्याद्यापक आर. एन. चौधरी यांनी नजीकच्या चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांची तपासणी केली. ज्यानंतर 14 मुली आणि 4 मुलांसह अधीक्षक आणि स्वयंपाकी अशा एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून आश्रमशाळा वस्तीगृह आणि शाळेतील विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी घेण्यास सुरवात केली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरली त्यानंतर आश्रमशाळेत पालकांनी एकत्रित होऊन गोंधळ घालत चाचणी करण्यास आणि बाधित विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास मज्जाव करण्यास सुरुवात केली. या आश्रमशाळेत एकूण 602 विद्यार्थ्यांपैकी 470 विद्यार्थी हजर होते.त्यापैकी 187 विद्यार्थी वस्तीगृहात 140 विद्यार्थी हजर होते. पालकांनी तपासणी थांबवण्यापूर्वी 22 मुली, 6 मुले आणि 2 कर्मचारी असे एकूण 30 जण लागण झाल्याचे आढळून आले. तर काही मुलांची चाचणी बाकी असतांनाच पालकांनी गोंधळ घालत लागण झालेल्या विद्यार्थ्यांसह चाचणी झालेले आणि न झालेले अशा सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन घराकडे पळ काढला. 


प्रशासनाची डोकेदुखी वाढली


या सर्व प्रकारानंतर आरोग्य यंत्रणा, आदिवासी प्रकल्प विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी घरी निघून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा शोध घेऊन आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गृह विलगिकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक चौधरी यांनी दिली आहे. तालुका आरोग्य विभाग ,पंचायत समिती प्रशासनाला सुरुवातीला घटनेची माहितीच नसल्याने फक्त रुग्णवाहिका आणून ठेवल्याने आदिवासी पालक भयभीत होत त्यांनी आपल्या मुलांना घेऊन पळ काढला, असल्याचंही समोर येत आहे.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha